गणेश खवसे
नागपूर : कावून, गा... जास्त येलून राह्यला... लयच आंगात आली तुह्या तं... बैताड बेलनंच हाय... जास्तच कल्लाच करून राह्यला... हे शब्द विदर्भातील जिल्ह्यांनाच नव्हे तर त्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना नवीन नाहीत. मात्र हे शब्द आता हळूहळू लयास जात आहे. एवढेच काय तर वऱ्हाडी बाेलीच नामशेष हाेण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे ‘वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा... मायबाेली बाेलाची लाज कायले पाह्यजे’ असे धडाक्यात सांगत वऱ्हाडी भाषा वाचविण्याची चळवळ अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने सुरू केली आहे. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त या मंचतर्फे दरवर्षी २३ फेब्रुवारीला ‘वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस’ साजरा केला जाताे. त्यांचे औंदा (यंदा)चे हे चाैथे वर्ष आहे.
प्रत्येक भाषेचे माहात्म्य वेगळे आहे. त्याची लय, चाल आणि भाषिक साैंदर्यही वेगळेच आहे. वऱ्हाडीलाही असेच कंगाेरे लाभले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाचे वारे गावातही शिरल्याने विदर्भातील गावागावात बाेलली जाणारी वऱ्हाडी आता लयास जाते की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे भाषा संवर्धनाची माेहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने अख्ख्या विदर्भातच लाेकचळवळ राबविण्यास सुरू केली आहे. यासाठी त्यांनी ‘वऱ्हाड धन’ नावाचे माेबाइल ॲपही तयार केले असून त्यात १० हजार शब्दांचा साठा करून ठेवला आहे. त्यात पुन्हा संशाेधन करून शब्दसाठा वाढविला जात आहे. वऱ्हाडी बाेली विशेष: गाेंदिया, गडचिराेलीपासून, वाशिम, बुलडाण्यापर्यंतच्या गावागावात बाेलली जाते. परंतु गाेंदियाची वऱ्हाडी वेगळी, नागपूरची वऱ्हाडी वेगळी, अमरावतीची आणि अकाेल्याची वऱ्हाडी वेगळी, असा किंचित फरक त्यामध्ये दिसून येताे.
असे राबविले जातात उपक्रम
- मासिक, दिवाळी अंक पूर्णत: वऱ्हाडी भाषेत प्रकाशित केला जाताे.
- वऱ्हाडी लेखन कार्यशाळा घेणे
- ऑनलाइन माेफत वर्ग घेणे
- दिनदर्शिकाही पूर्णपणे वऱ्हाडीमध्ये प्रकाशित करणे
- निबंध स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा घेणे
- वऱ्हाडी साहित्य संमेलन घेणे
वऱ्हाडीचा महिमा लय माेठा हाय. तेच्यानं हे वऱ्हाडी खत्तम व्हू नये, असे आमाले वाटते. मनून आमी वऱ्हाडीले वाचवण्यासाठी एक चळवळ मनून भाषा साैंवर्धनाचं काम हाती घेतलं हाये. येच्या माध्यमातून वऱ्हाडी जिवंत राहावी, हेच आमची विच्छा हाय.
- आबासाहेब कडू, सल्लागार, अखिल भारतीय वऱ्हाडी मंच