सुमेध वाघमारे
नागपूर : तब्बल नऊ वर्षांपासून कागदावरच असलेल्या मेडिकलमधील कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया आता कुठे सुरू होत असतानाच बुधवारी (दि. २७) वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मुंबईतील बैठकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला संलग्न करण्यावर चर्चा झाली. यामागे मेडिकल हॉस्पिटल पळविण्याचा घाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
उपराजधानीत दरवर्षी जवळपास पाच हजारांवर नव्या कॅन्सरग्रस्तांची भर पडते. धक्कादायक म्हणजे, तोंडाच्या कॅन्सरमध्ये नागपूर देशात पहिल्या पाचमध्ये, तर स्तनांच्या कॅन्सरमध्ये नागपूर पहिल्या दहामध्ये आहे. असे असतानाही, कॅन्सरवरील अद्ययावत उपचारासाठी सरकार गंभीर नाही. २०१२ मध्ये कॅन्सरग्रस्तांनाच उपचारासाठी आंदोलन करावे लागले. त्यावेळी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजल्याने मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटलची घोषणा करण्यात आली. परंतु पाच वर्षे होऊनही पुढे काहीच झाले नाही. अखेर न्यायालयात दाखल केलेल्या यावरील जनहित याचिकेवर जून २०१७ मध्ये न्यायालयाने दोन वर्षांत कॅन्सर हॉस्पिटल उभारावे, असे निर्देश दिले. परंतु अद्यापही हे हॉस्पिटल हवेतच आहे.
दरम्यानच्या काळात सरकारने बांधकामासाठी ७६ कोटींना प्रशासकीय मंजुरी दिली, तर यंत्रखरेदीसाठी २३ कोटी रुपयांचा निधी खात्यात जमाही केला. बांधकामाची निविदा प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मुंबईत बैठक घेतली. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमधील उपचाराच्या सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचा त्यांनी सूचना केल्या. याच बैठकीत दुग्धविकास मंत्री केदार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच मेडिकलमध्ये संलग्न करण्याची मागणी केली. यामुळे मेडिकलच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित झाल्याचे चित्र पुढे येत आहे.
- मेयो, मेडिकलच्या खासगीकरणासाठी पाहणी
मेयो व मेडिकलच्या कोणत्या विभागाचे ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’च्या माध्यमातून (पीपीपी) खासगीकरण केले जाऊ शकते, याचा आढावा घेण्यासाठी ‘इंटरनॅशनल फायनान्स काॅर्पाेरेशन’च्या (आयएफसी) चार सदस्यांचे पथक बुधवारपासून नागपुरात ठाण मांडून आहे. गुरुवारी त्यांनी मेडिकलच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलचीही पाहणी केली.
- गरीब आहे म्हणूनच जुनाट कोबाल्टवर उपचार
मेडिकलमधील कॅन्सर विभाग (रेडिओथेरपी) मरणासन्न अवस्थेत आहे. २००६ मध्ये लावलेले कोबाल्ट युनिट कालबाह्य झाले आहे. परंतु आजही याच यंत्रावर ‘रेडिएशन थेरपी’ दिली जाते. गरीब रुग्ण असल्यानेच कोणाचेच याकडे लक्ष नाही; तर २००९ मध्ये स्थापन केलेले तीन चॅनलचे ‘ब्रॅकी थेरपी’ यंत्र वर्षभरापासून बंद पडले आहे.