कमल शर्मा
नागपूर : जिल्ह्यामधील बारुद कारखान्यांच्या कार्यप्रणालीविषयी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यावेळी आणखी एक धक्कादायक माहिती लोकमतला मिळाली आहे. त्यानुसार, कारखान्यात कार्यरत बड्या अधिकाऱ्यांच्या पत्नी आपोआप लखपती होत आहेत. त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला मोठी रक्कम जमा होत आहे. ही रक्कम कोण आणि कशाकरिता जमा करतो, याचे उत्तर व्यवस्थापनाकडे नाही.
देशातील स्फोटके व्यवसायाचे नागपूर जिल्हा मुख्य केंद्र आहे. जिल्ह्यात स्फोटके व डिटोनेटर तयार करणारे सुमारे २० कारखाने आहेत. रोज ३५ हजार टर बारुद व ४० हजार डिटोनेटर तयार करण्याची या कारखान्यांची क्षमता आहे. एका कारखान्यात रोज ५०० ते १००० किलो स्फोटके उपलब्ध असतात. नियमानुसार ही स्फोटके मॅग्झिनमध्ये ठेवणे आवश्यक आहे, पण या कारखान्यातील स्फोटके जमिनीवर ठेवली जातात. त्यामुळे कारखान्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्फोटके विभागाचे कारखान्यांना समर्थन आहे. माया गोळा करण्यासाठी कारखान्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत:च्या मुलालाच ठेकेदार केले आहे. याशिवाय अधिकाऱ्यांच्या पत्नीही बेकायदेशीर रकमेमुळे लखपती होत आहेत. संबंधित महिला एवढी मोठी रक्कम कमविण्यासाठी कोणते काम करतात, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा असामाजिक तत्त्वांशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोटके कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला याविषयी विचारणा केली असता, त्यांनी याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
लोकमतकडे बँक खात्याची माहिती
स्फोटके व डिटोनेटर तयार करणाऱ्या एस.बी.एल. कंपनीतील चार मोठ्या अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या बँक खात्याची माहिती लोकमतकडे आहे. या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला लाखो रुपये जमा केले जात आहेत. या अधिकाऱ्यांकडे स्फोटके साठविण्याची व विकण्याची जबाबदारी आहे. त्यात गैरप्रकार होण्याचा संशय निर्माण झाला आहे. हे संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.