विजय नागपुरे
कळमेश्वर : गावाच्या विकासात स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण महत्त्वाचे ठरत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी गावागावातील स्मशानभूमी स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशीच साैंदर्यीकरणातून स्मार्ट झालेली वरोडा येथील स्मशानभूमी इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कळमेश्वर- सावनेर महामार्गावर असलेल्या वरोडा गावाच्या मध्यभागातून नदी गेलेली आहे. या नदीच्या तीरावर स्मशानभूमी आहे. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंटीकरण केले. स्मशानभूमी परिसरात शासनाच्या वृक्षलागवड अभियानातून २०० रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. येथे पक्क्या स्वरूपाचे स्मशानशेड बांधण्यात आले असून, शोकसभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. स्मशानभूमीत भविष्यात कुणीही अतिक्रमण करू नये, यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. स्मशानभूमीतून नदीत उतरण्यासाठी घाट बनविला असून, या स्मशानभूमीला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. या मार्गावरून जाताना स्मशानभूमीचे प्रवेशद्वार तसेच इतर विकास कामे येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
....
स्मशानभूमीचा परिसर सामान्यत: घाणीने व्यापलेला असतो. त्यामुळे अंत्ययात्रेला येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास होऊ नये म्हणून गावातील स्मशानभूमीला स्वच्छ आणि सुंदर लूक देण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना जनसुविधाअंतर्गत विशेष अनुदान २०२०-२१ करिता स्मशानभूमीतील उर्वरित सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत, भगवान शंकराची मूर्ती, विरुद्ध बाजूने नदी घाट बांधकाम, हायमास्ट लाईटसाठी प्रस्ताव सादर करणार आहे.
- दिलीप डाखोळे, सरपंच, ग्रामपंचायत वरोडा.
...
मोकळ्या जागेवर स्मशानशेड, शोकसभागृह, पोच रस्ता, संरक्षण भिंतीचे नियोजन करून स्मशानभूमी ही अंत्यसंस्कारासाठीच नसून इतरही वेळेस नागरिकांना विरंगुळा करण्यासाठी व निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी उपयोगात यावी, यादृष्टीने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने योग्य नियोजनबद्ध कार्यक्रम आखून ते प्रत्यक्षात उतरविण्यात येत आहे.
- प्रशांत कुंटे, कनिष्ठ अभियंता,
पंचायत समिती, कळमेश्वर.