नागपूर : गेल्या दाेन दिवसापासून वरुणराजाने नागपूरवर चांगलीच कृपा केली. सकाळी थाेडी उसंत घेतल्यानंतर दुपारी दीड वाजतापासून जाेरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाचे हे सत्र थांबून थांबून चालले हाेते. दुसरीकडे ग्रामीण भागात अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला. सावनेर तालुक्यात सायंकाळी ५ वाजतापर्यंत १४८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली, त्यामुळे काेलार नदीला पूरस्थिती निर्माण झाली. नदीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. दुसरीकडे हिंगणा क्षेत्रातील वेणा नदीही जाेरदार पावसामुळे दुथडी वाहत आहे. जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यात जाेरदार पाऊस झाला.
शहराच्या सीमालगतच्या भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र हाेते. सततच्या पावसाने समस्या निर्माण हाेण्याची शक्यता हाेती, मात्र सायंकाळी पावसाने थाेडी उसंत घेतल्याने नागरिकांना थाेडा दिलासा मिळाला. मानकापूरमधील एका घरात पाणी शिरल्याची तक्रार महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाली. तसेच जिल्ह्यातील कुही, भिवापूर, उमरेड, माैदा, पारशिवनी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याची माहिती आहे.
नागपुरात अलर्ट कायम
नागपुरात २४ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचे सत्र कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दाेन दिवसात जाेरदार पावसाने दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. शहरात सकाळच्या वेळी काही काळ ऊन निघाले. त्यामुळे तापमानात ५.१ अंशाची वाढ हाेऊन ते ३१.४ अंश नाेंदविण्यात आले. आर्द्रता ९८ ते १०० टक्क्यावर कायम हाेती. सकाळी ८.३० वाजतापर्यंत नागपूर शहरात ३६.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
कोलार नदीला पूर
काेलार नदीला पूर आल्याने सावनेरसह आसपासचा भाग जलमय झाला. छिंदवाडा राेड, रेल्वे स्टेशनच्या मागील भाग व आंबा टाेला परिसरातील घरात पाणी शिरले. नवीन ले-आऊटमध्ये पाणी निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले हाेते. अनेकांच्या घरातील धान्य, कपडे, फर्निचर आदी खराब झाल्याचीही माहिती आहे. अनेक वाहने पाण्यात बुडाली. त्यामुळे उथळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांची व्यवस्था नगर परिषदेच्या शाळेत करण्यात आली.
कच्चा माल नदीत बुडाला
कळमेश्वर एमआयडीसी परिसरातील नालाही दुथडी वाहत आहे. पुराचे पाणी येथील प्रगती ॲग्राेटेक कंपनीची सुरक्षा भिंत ताेडून आतमध्ये शिरले. यामुळे कंपनीमध्ये असलेल्या कच्च्या मालाची पोती पुरात वाहून गेली. कंपनीतील मशीन्सही बुडाल्या. विशेष म्हणजे, या कंपनीचे २४ जुलै राेजी उद्घाटन हाेणार हाेते.
बचाव कार्यात एसडीआरएफचे पथक
हिंगणा क्षेत्रातून वाहणारी वेणा नदी दुथडी वाहत आहे. नदीच्या मधाेमध राधाकृष्ण मंदिर आहे. येथे राहणारा एक मनाेरुग्ण पुरात फसल्याची माहिती मिळाली. सूचना मिळताच एसआरडीएफचे जवान दुपारी ३ वाजता घटनास्थळी पाेहचले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर एसडीआरएफच्या पीएसआय अजय काळसर्पे, सुजित जंबेली यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मनाेरुग्णाला सुरक्षित बाहेर काढले. विशेष म्हणजे मंदिराच्या छतापर्यंत पाणी पाेहचल्यानंतर त्या व्यक्तीला जाग आल्याचे सांगण्यात येत आहे. काठावर असलेल्या लाेकांनी त्याला शेजारच्या लहान मंदिरात जाण्याची सूचना केली. यानंतर हिंगणा पाेलिसांचे पीआय सारिन दुर्गे, पीआय सपना क्षीरसागर, तहसीलदार संताेष खंडारे, ग्रामसेवक प्रदीप वाभिटकर घटनास्थळी पाेहचले.