नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ज्येष्ठ कवी व विचारवंत डॉ. पी. व्ही. वरवरा राव (८१) यांना गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकरणामध्ये सहा महिन्यांसाठी नियमित जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने सोमवारी एल्गार परिषद प्रकरणामध्ये राव यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून सहा महिन्यांसाठी विविध अटींसह जामीन मंजूर केला. सुरजागड येथील गुन्ह्यामध्ये त्यांना त्या निर्णयाच्या आधारावर आणि समान अटींसह दिलासा देण्यात आला. २३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी सुरजागड लोह खदान परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकूण ८० वाहने जाळली होती. तसेच, वाहनचालक, त्यांचे सहायक व मजुरांना काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यांना अंगावर डिझेल टाकून जाळून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. अश्लील शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणात ट्रकचालक राजबिंदरसिंग शेरगील यांच्या तक्रारीवरून एटापल्ली पोलिसांनी २७ डिसेंबर २०१६ रोजी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३४१, ३४२, ४३५, ३२३, ५०४, १४३, १४७, १४९, १२०-ब यासह विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात राव यांचा या घटनेशी संबंध आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. ८ जून २०२० रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने राव यांना या गुन्ह्यात जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. राव यांच्या वतीने ॲड. फिरदोस मिर्झा व ॲड. निहालसिंग राठोड यांनी कामकाज पाहिले.