एमपीआयडी न्यायालय : जामीन अर्ज फेटाळला नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी लुबाडणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर येथील वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याचा चौथ्यांदा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मीनगर येथील रहिवासी विवेक अशोक पाठक यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रशांत वासनकर याच्यासह नऊ जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २७ जुलै २०१४ रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर आणि अभिजित चौधरी, अशा तिघांना अटक केली होती. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने वार्षिक ४० ते १५० टक्के जादा व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने, पर्क, लिक्विड अशा वेगवेगळ्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांच्या २००८ पासून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. या ठेवींपैकी ३० टक्के चेकद्वारे आणि ७० टक्के रोखेने होत्या. वासनकरने मुदत संपूनही ठेवी आणि परतावा परत न करता ठेवीदारांची फसवणूक केली होती. आतापर्यंत ६८२ गुंतवणूकदारांनी रीतसर तक्रारी नोंदवलेल्या असून, फसवणुकीची रक्कम १८१ कोटी २५ लाख रुपये झालेली आहे. प्रशांत वासनकर याचा तिसऱ्यांदा जामीन फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा त्याला उच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या संदर्भात ठोस प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते आणि परत एमपीआयडी विशेष न्यायालयाकडे पाठविले होते. त्यानुसार वासनकर याने पैसे परत करण्याच्या संदर्भात प्रस्ताव सादर करून, आपणास केवळ ३० कोटी रुपये देणे असल्याचे त्याने सांगितले होते. आपणास जामिनावर सोडल्यास आहेत त्या मालमत्ता आणि ‘गुडविल’ विकून पैसे परत करतो, असे त्याने सांगितले. यावर सरकार पक्षाने तीव्र आक्षेप घेतला होता. तो पुन्हा दिशाभूल करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील कल्पना पांडे तर आरोपीच्या वतीने अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
वासनकरला चौथ्यांदा न्यायालयाचा फटकार
By admin | Published: January 24, 2017 2:45 AM