लोकमत विशेषजगदीश जोशी नागपूरपाच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांना अंदाजे एक हजार कोटीने चुना लावणाऱ्या वासनकर समूहाच्या आणखी २८ कोटी रुपयांच्या संपत्तीचा छडा लागला आहे. आॅटोमोबाईल व्यवसायी आणि मुंबई येथील व्यापाऱ्यांसह अनेकांनी ही संपत्ती दडवून ठेवली आहे. त्यांना घेराबंदी करण्यासाठी आर्थिक गुन्हे पथक पुन्हा सक्रिय झाले आहे. या पूर्वी वासनकर समूहाची १८ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. दरम्यान काही गुंतवणूकदारांना उशिरा जाग आली असून त्यांनी गुरुवारी गुन्हे शाखा कार्यालय गाठून पोलीस उपायुक्त दीपाली मासीरकर यांची भेट घेतली. वासनकरने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लुबाडणूक केलेली आहे. धंतोली पोलीस ठाण्यात ९ मे रोजी प्रशांत वासनकर त्याची पत्नी भाग्यश्री, भाऊ विनय वासनकर,त्याची पत्नी मैथिली वासनकर, साळा अभिजित चौधरी, सासू कुमुद चौधरी आणि आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रशांत, विनय आणि अभिजितला अटक करण्यात आली होती. वासनकरविरुद्ध दहा महिन्यात नव्याने ५०० गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यांना ११० कोटी रुपयांनी लुबाडण्यात आलेले आहे. वासनकर समूह कार्यालयांच्या झडतीत आणि प्राथमिक तपासातच हा घोटाळा ७०० हून अधिक कोटींचा असल्याचे पोलिसांना समजले होते. १८ कोटींची चल आणि अचल संपत्ती जप्त करून पोलीस शांत बसले होते. वासनकर यांच्याशी संबंधित लोकांनी अनेक गुंतवणूकदारांना तक्रार करण्यासाठी आर्थिक गुन्हे पथकाकडे पोहचूच दिले नव्हते. अनेक जण आपणास पैसे परत मिळतील या आशेवर होते. परंतु ही आशा मावळताना दिसताच ५० हून अधिक गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेचे कार्यालय गाठले. त्यांनी आपल्यासोबत ३०० हून अधिक गुंतवणूकदार असल्याचा दावाही केला. या लोकांनी १०० कोटी रुपये गुंतवलेले आहेत. उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी गुन्हे शाखेचा कार्यभार स्वीकारताच वासनकर प्रकरणाच्या तपासात गती आलेली आहे. त्याच्या बेनामी संपत्तीचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आलेले आहे. या पथकाने २८ कोटींच्या संपत्तीचा छडा लावला. आॅटोमोबाईल व्यावसायिकासह एक डझनहून अधिक व्यापाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. एकट्या आॅटोमोबाईल व्यावसायिकाकडे १० कोटींची संपत्ती असल्याचे समजले आहे. त्यांना चौकशीसाठी गुन्हे शाखा कार्यालयात बोलावण्यात आलेले आहे.
वासनकरच्या संपत्तीचा छडा
By admin | Published: February 28, 2015 2:14 AM