निधीची चणचण : भिवापूर तालुक्यातील १५ गावांचा समावेश मालेवाडा : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वसुंधरा पाणलोट अभियानांतर्गत भिवापूर तालुक्यातील १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने तीन वर्षांपासून या अभियानाचे तालुक्यात ‘भिजत घोंगडे’ आहे. परिणामी, या अभिनांतर्गत करण्यात येणारी विविध कामे कधी करणार, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. या अभियानांतर्गत २०१४-१५ मध्ये प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला होता. यात भिवापूर तालुक्यातील चारगाव, गोटाडी, मांगरूड, बोटेझरी, पाहमी, चिचाळा, गरडापार, मालेवाडा, उखळी, सुकळी, सालेभट्टी, चोरविहिरा व टाका या १२ गावांसह कोंडापूर, भोवरी व येडसंबा या तीन रिठी गावांचा समावेश करण्यात आला होता. या अभियानांतर्गत शेतांची बांधबंधिस्ती, शेततळ्यांची निर्मिती व दुरुस्ती, बोड्यांची (लहान तलाव) निर्मिती, शेतकरी बचतगट तयार करणे, त्यांना रोजगारविषयक मार्गदर्शन करणे, निधी उपलब्ध करून देणे, विकास कामे करणे आदी कामे करणे क्रमप्राप्त आहेत. यासाठी समिती स्थापन करावी लागते. समिती नियुक्तीच्या वादामुळे काही गावे या अभियानातून वगळली. काही गावांमध्ये बचतगटांनाप्रशिक्षण देण्यात आले. यातील सक्रिय शेतकरी गटांना स्वयंरोगारासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य अनुदानावर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. वास्तवात, तीन वर्षांच्या काळात एकाही शेतकरीगटाला अर्थपुरवठा करण्यात आला नाही. दुसरीकडे, प्रेरक प्रवेश कार्यक्रम पाण्याचे हौद, धुण्याचे ओटे, संरक्षण भिंत आदी कामांना शासनाने मंजुरी दिली. परंतु, निधी न मिळाल्याने ती कामे करावयाची कशी, असा प्रश्न बचतगटाच्या सदस्यांना पडला. (वार्ताहर)
वसुंधरा पाणलोटचे ‘भिजत घोंगडे’
By admin | Published: February 23, 2017 2:16 AM