नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अखेर जिल्हा संघटनांच्या १४ व १६ वर्षांखालील खेळाडूंसाठी निवड चाचण्या जाहीर करण्यात आल्या. या चाचण्या ५ ते ९ जुलैपर्यंत होतील.
लोकमतने याकडे लक्ष वेधले होते. जिल्हा क्रिकेट संघटनांनी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या वतीने त्यासाठी पुरेसे उपक्रम राबविल्या जात नाहीत आणि ते केवळ नागपुरातील खेळाडूंवर लक्ष केंद्रित करतात, असा आरोप केला होता. त्यामुळे व्हीसीएने तातडीने सक्रिय होऊन निवड चाचण्या जाहीर केल्या. जाहीर कार्यक्रमानुसार या चाचण्या ११ ठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेत होतील. व्हीसीएने निवडकर्त्यांची नियुक्तीही केली असून, त्यात किशोर वाकोडे (अमरावती), अमोल खोब्रागडे (यवतमाळ व गोंदिया), नंदू गोरे (वर्धा व भंडारा), राहुल चिखलकर (बुलडाणा व रामटेक), शंकर पाटकर (वाशीम व चंद्रपूर), किशोर वाकोडे (अकोला) व दीपक जोशी (गडचिरोली) यांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत साळुंके यांनी व्हीसीएच्या निर्णयाचे स्वागत केले तसेच, व्हीसीए उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांचे आभार मानले.
---------------
असा आहे कार्यक्रम
अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा व वाशीम येथे ५ व ६ जुलै तर, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक, भंडारा व गोंदिया येथे ८ व ९ जुलै रोजी अनुक्रमे १६ व १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी निवड चाचणी होईल.