नागपूर विद्यापीठ : हिवसे यांची कागदपत्रे योग्यच असल्याचा दावा नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांमधील शीतयुद्धाची चिन्हे असताना कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी त्यात मध्यस्थी केली आहे. वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांची शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे योग्य असल्याचा त्यांनी निर्वाळा दिला आहे. सोबतच कुलसचिवांनी हिवसे यांच्या कागदपत्रांतील काढलेल्या त्रुटी योग्य नसल्याचेदेखील त्यांनी सांगितले. डॉ.राजू हिवसे यांनी वित्त व लेखाअधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कुलसचिवांनी त्यांना एक पत्र पाठविले. डॉ.हिवसे यांनी सादर केलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रातील त्रुटी यात काढण्यात आल्या. अभ्यासक्रमाच्या ‘ट्रान्सस्क्रीप्ट’वर कुलसचिवांचा ठप्पा नाही. त्यामुळे गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रासाठी संबंधित संस्थेचे ‘जेन्युअन सर्टिफिकेट’ देण्यात यावे, असे डॉ.हिवसे यांना कळविण्यात आले. यासंदर्भात डॉ.हिवसे तसेच इतर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला व कुलगुरूंना पुढे काय करावे याची विचारणा केली. डॉ.हिवसे यांनी ‘बिट्स-पिलानी’ येथून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी मूळ कागदपत्रे विद्यापीठाला दाखविली होती. त्यामुळे ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ सादर करण्याची आवश्यकताच नव्हती. अशी विचारणा कुलसचिव पूरण मेश्राम यांनी करायला नको होती, असे मत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. सोबतच ‘जेन्युअन सर्टिफिकेट’ म्हणजेच पदवीची पडताळणी करणे हे रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही. हे काम संबंधित आस्थापनेने करायचे असते. बहुसंख्य मोठ्या कंपन्या व कार्यालयात अशीच पद्धत आहे. त्यामुळे विद्यापीठाने डॉ.हिवसे यांच्या पदवीची पडताळणी प्रक्रिया करायला हवी होती. त्यांची पदवी नियमानुसारच असल्याचा ‘मेल’ ‘बिट्स पिलानी’कडून मला आलेला आहे. आता त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्नच नाही, असे डॉ.काणे म्हणाले. विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.(प्रतिनिधी) ‘रुसा’च्या निधीवरून पडणार गट नागपूर विद्यापीठाला ‘रुसा’अंतर्गत (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण अनुदानापैकी ५ कोटी रुपयांचा पहिला हप्तादेखील विद्यापीठाला देण्यात आला आहे. या निधीचे वाटप तर करण्यात आले आहे. परंतु पुढील टप्प्यात येणारा निधी कुठे वापरावा याबाबत अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे या निधीचे वाटप कसे करावे यावरुन नजीकच्या काळात शीतयुद्ध पेटणार असल्याची चिन्हे आहेत.
अधिकाऱ्यांच्या शीतयुद्धात कुलगुरूंची मध्यस्थी
By admin | Published: July 24, 2016 2:06 AM