नागपूर: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ इंडिया (आयसीएआय) द्वारे घेण्यात येणाऱ्या सीए इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये नागपुरातून दाेन्ही ग्रुपची परीक्षा देणारे वेदांश जयपुरीया, श्रेया साबू आणि काैतुक येमदे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले आहेत. वेदांत काकानी व वीर अग्रवाल यांनीही टाॅप फाईव्हमध्ये स्थान मिळविले आहे.
बारावीनंतर सीए फाउंडेशन परीक्षेत यश मिळविल्यानंतर एक वर्षाची तयारी करून सीए इंटरमिडिएटची परीक्षा द्यावी लागते. यामध्ये एक ग्रुप किंवा दाेन्ही ग्रुपची एकाच वेळी परीक्षा देता येते. नव्या अभ्यासक्रमानुसार पहिल्या ग्रुपमध्ये ३ व दुसऱ्या ग्रुपमध्ये ३ अशा ६०० गुणांची परीक्षा हाेते. यावर्षी ३ मे ते १७ मे या काळात सीएची परीक्षा घेण्यात आली.
यात दाेन्ही ग्रुप घेऊन ६८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ज्यामधून १४८ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. यात वेदांश गाैरव जयपुरीया या विद्यार्थ्याने ६०० पैकी ५०४ गुणांसह अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर श्रेया अमित साबू या विद्यार्थिनीने ६०० पैकी ४७१ गुण व काैतुक प्रदीप येमदे या विद्यार्थ्याने ६०० पैकी ४६६ गुण प्राप्त करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळविले. टाॅप फाईव्हमध्ये वेदांत संदीप काकानी याने ६०० पैकी ४५६ तर वीर रिषी अग्रवालने ४५० गुण प्राप्त केले आहेत.
दाेन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ग्रुपमध्ये ११२ विद्यार्थी यशस्वी ठरले तर ग्रुप-२ मध्ये केवळ ३ विद्यार्थ्यांना यश मिळविता आले. केवळ पहिल्या ग्रुपची परीक्षा ६६० विद्यार्थ्यांनी दिली, ज्यामधून १०१ विद्यार्थी यशस्वी ठरले. १२९ विद्यार्थ्यांनी ग्रुप-२ ची परीक्षा दिली, ज्यातील १४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.