लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर व प्रकल्प संचालक आत्मा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर आयोजित हा महोत्सव शासकीय वसाहत रविनगर येथील खुल्या मैदानात रविवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे.
९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत ‘रानभाज्या महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. रानभाज्या पावसाच्या सुरवातीला आढळून येत असून औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतात. सदर महोत्सवामध्ये शेवगा, काटवल, गुळवेल, बांबू आस्ते, खापरखुटी, सुरण, चंदनबटवा यासारख्या विविध रानभाज्या विक्रीस उपलब्ध होणार आहेत.
रानभाज्यांचे सेवन मधुमेह, मूळव्याध, डोकेदुखी, मुतखडा, हृदयविकार, पित्त, श्वसनाचे आजार, मानसिक थकवा, स्थूलपणा, हत्तीरोग, सांधेदुखी, अतिसार, अपचन यासारख्या विविध विकारांसाठी हितकारक आहे.