लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजीबाजारातील गर्दी ही प्रशासनासाठी चांगलीच डोकेदु:खी ठरली आहे. मुख्य बाजारपेठेचे विलगीकरण करूनसुद्धा बाजारातील गर्दी कमी होताना दिसत नाही. यावर पर्याय म्हणून कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आहे.कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न होत आहे. सोशल डिस्टन्सिंग हे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र आहे. पण भाजीबाजारात होत असलेल्या गर्दीमुळे त्याचा फज्जा उडताना दिसतो आहे. भाजीबाजारांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मनपा आयुक्तांनी शहरातील मध्यवर्ती कॉटन मार्के ट बाजार बंद केला. यानंतर शहरातील विविध नऊ झोनमध्ये मोकळ्या मैदानात भाजीबाजार भरविला. मात्र, याही ठिकाणी नागरिकांकडून गर्दी झाली. भाजीबाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले मात्र, त्यावर पूर्णत: नियंत्रण मिळविता आले नाही. भाजीबाजारात होणारी गर्दी लक्षात घेता कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ‘फार्म टू होम’ची संकल्पना राबविण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंंद शेंडे व कृषी उपसंचालक उपरीकर यांच्या नेतृत्वात शहरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गटांशी चर्चा करण्यात आली. ५० गटांनी यासाठी होकार दर्शविला. यानंतर गत २७ मार्चपासून या शेतकरी गटांनी शहरातील मनपाच्या दहाही झोनमधील विविध वस्त्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या घरी शेतातील ताजा भाजीपाला/फळे, फिरते भाजीपाला विक्री केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला.कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने आज हे फिरते भाजीपाला विक्री केंद्र शहरवासीयांना ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ (फार्म टू होम) या तत्त्वावर उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी/योग्य भावाने त्यांच्या घरापर्यंंत ताजा भाजीपाला व फळे मिळत आहेत. गर्दी टाळा एवढीच अपेक्षाघराबाहेर पडून शहरात गर्दीच्या ठिकाणांहून भाजीपाला घेण्याऐवजी आपल्या वस्त्यांमध्ये येऊन भाजीची विक्री करणाऱ्या शेतकरी गटांकडून भाजीपाला विकत घ्यावा व बाहेर होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंंद शेंडे यांनी केले आहे.
नागपुरात भाजी आता 'फार्म टू होम'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 8:37 PM
कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आहे.
ठळक मुद्देकृषी विभागाचा पुढाकार : ५० शेतकरी गटांचा केला समावेश