सोमलवाड्यातील भूखंड ठेवला होता गहाण :
सक्करदरा शूटआऊटमध्ये खुलासा
जगदीश जोशी
नागपूर : १८ नोव्हेंबरला सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळी घालून हत्या करण्यात आलेल्या भाजी विक्रेता उमेश ढोबळे याने कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्याकडूनही आठ लाखांचे कर्ज घेतले होते, अशी माहिती पुढे आली आहे.
उमेशची शेख शाकीर शेख हसन आणि सय्यद इम्रान सय्यद या दोघांनी गोळी घालून हत्या केली. सध्या आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत त्यांच्याकडून अनेक खुलासे झाले आहेत.
शाकीर आलू-कांद्याचा ठोक व्यापारी असून उमेशने त्याच्याकडून माल घेऊन दुसरीकडे विकला. मात्र त्याचे सहा लाख रुपये परत केले नाहीत. त्या वादातून उमेशची हत्या केल्याचे शाकीरने पोलिसांना सांगितले आहे. त्यासाठी शाकीरने
ताजाबादमधील कुख्यात शेख नदीम ऊर्फ राजा गोल्डन याच्याकडून पिस्तूल विकत घेतले होते. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
दरम्यानच्या चौकशीत उमेश ढोबळे याने कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्याकडून आठ लाख रुपये कर्ज घेतले होते. बदल्यात त्याने सोमलवाड्यातील प्लॉट आंबेकरकडे गहाण ठेवला होता. दोन वर्षापूर्वी घेतलेल्या या कर्जाच्या व्याजापोटी मोठी रक्कम उमेशने आंबेकर आणि त्याच्या साथीदारांना दिली होती. तरीसुद्धा आंबेकर आणि त्याचे साथीदार उमेशला धमकावत असल्याने तो प्रचंड दहशतीत आला होता.
गेल्यावर्षी गुन्हे शाखेने कुख्यात आंबेकरचे साम्राज्य उद्ध्वस्त केले. त्याच्याकडून कोट्यवधीची मालमत्ता, कागदपत्रे जप्त केली. त्यात उमेशच्या भूखंडाची कागदपत्रे होती. त्यामुळे गुन्हे शाखेने उमेशला चौकशीसाठी बोलवून घेतले होते. त्यावेळी झालेल्या चौकशीत उमेशने आंबेकरकडून कर्ज घेतल्याचे कबूल केले होते, असे समजते. दरम्यान, आंबेकर कारागृहात गेल्यामुळे उमेशला दिलासा मिळाला असताना शाकीरने त्याच्यामागे कर्जासाठी तगादा लावला आणि अखेर त्याची हत्या केली.
आंबेकरकडून उमेशने कर्ज घेतल्याची बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या परिवाराकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते.
---