नागपूर : आठवड्यापासून बाजारात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, शेतकऱ्यांकडून आवक वाढली आहे. ठोकमध्ये भाज्या स्वस्त, पण किरकोळ बाजारात भाव दुप्पट आहेत. मार्च अखेरपर्यंत भाज्यांची मुबलक आवक राहणार आहे. ठोकमध्ये भाज्या स्वस्त असल्या तरी शेतकऱ्यांना हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
किरकोळमध्ये खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येत आहे. कॉटन मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी येत आहे. आवक वाढल्यास भाव आणखी कमी होतील. कॉटन मार्केटमध्ये दररोज लहान-मोठ्या २५० पेक्षा जास्त गाड्यांची आवक आहे. स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढल्याचे कॉटन मार्केट सब्जी, फ्रूट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.
महाजन म्हणाले, मध्यंतरी मुसळधार पावसामुळे भाज्या शेतातच खराब झाल्या. त्यामुळे भाव अतोनात वाढले होते. ग्राहक किलोऐवजी अर्धा किलो खरेदीवर समाधान मानत होते. आता बाजारात दोन ते अडीच महिन्यापूर्वी लागवड केलेल्या भाज्या विक्रीला येत आहेत. सर्वच माल स्थानिक उत्पादकांचा आहे. वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने अन्य जिल्हे आणि राज्यातील काही भाज्यांची आवक जवळपास बंद झाली आहे.
रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री
ठोक बाजारात व्यापारी आणि अडतियांचे कमिशन टाळण्यासाठी उत्पादक शेतकरी आणि युवक उमरेड रोड, सक्करदरा, नंदनवन, रेशीमबाग आणि शहरातील अनेक चौकातील कडेला भाज्यांची विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. फूलकोबी १० रुपयाला एक आणि पालक, कोथिंबीर, मेथीची एक जुडी १० रुपयात विक्री करीत आहेत. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांची चंगळ आहे.
रविवारी भाज्यांचा किलो भावाचा तक्ता :
भाज्या ठोक किरकोळ
वांगे ५-८१५-२०
फूलकोबी ५१५-२०
पत्ताकोबी५-६१५-२०
हिरवी मिरची१२-१५२०-२५
कोथिंबीर १५ २०-२५
टमाटर २० ३०
चवळी शेंग २० ३०
गवार शेंग २० ३०
कारले २० ३०
भेंडी २० ३०
कोहळे २० ३०
लवकी १० २०
पालक५ १५
मेथी १० २०
चवळी १० २०
सिमल मिरची २० ३५
ढेमस ३० ४५
परवळ ३० ४५
तोंडले २० ३०
दोडके २५ ४०