नागपूर : धान्य, कडधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नागपुरातील घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळमध्ये भाज्याही दुप्पट आणि तिप्पट दरात विकल्या जात आहे. काही ग्राहकांनी आर्थिक बचतीसाठी घाऊक बाजाराकडे धाव घेतली आहे. किरकोळमध्ये कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे भाव प्रति किलो ६० रुपयांवर गेले आहे. भाज्यांना संजीवनी मिळाल्याने पुढे भाव कमी होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे गेल्या आठवड्यात भाज्यांची आवक कमी झाल्याने किमती वाढल्या. पण काही दिवसातच उतरल्या. कळमना आणि उपबाजार कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती आटोक्यात आहेत. किरकोळमधील अतोनात किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सध्या स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा ७० टक्के माल विक्रीसाठी येत आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात भाज्यांचे भाव गगनाला पोहोचतात. पण यंदा एप्रिलमध्ये आलेल्या पावसामुळे शेत हिरवेगार आहेत. शिवाय घाऊकमध्ये किमतीही कमी आहेत. किरकोळ विक्रेते खराब हवामानामुळे भाज्यांचे भाव वाढल्याचे कारण देत आहेत. पावसामुळे काही भाज्यांचा दर्जा घसरला आहे. तर दुसरीकडे पावसामुळे भाजी पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. शेतात भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यानंतरही आवक वाढेल भाव कमी होतील, अशी प्रतिक्रिया महात्मा फुले फ्रूट व सब्जी मार्केट अडतिया असोसिएशनचे (कॉटन मार्केट) सचिव राम महाजन यांनी दिली.
किरकोळमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, भेंडी, कारले, गवार, पालक, मेथी, फणस या भाज्यांचे भाव ६० ते ८० रुपयांदरम्यान आहेत. यंदा टोमॅटो आटोक्यात असून ३० रुपये किलो आहेत. लवकरच दर कमी व्हावेत, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे. टोमॅटो स्थानिक उत्पादकांसह बेंगळुरू, मदनपल्ली, तर सिमला मिरची, परवळ, कारले, तोंडले रायपूर, भिलाई, दुर्ग येथून विक्रीला येतात. कोथिंबीर स्थानिकांकडून आणि नाशिक तसेच जगदलपूर आणि मौदा येथून हिरवी मिरचीची आवक आहे. भाजीपाला ठोक भाव किरकोळ भाव : वांगे १५ ३०हिरवी मिरची ३० ६०कोथिंबीर ४० ६०टोमॅटो २० ४०फूल कोबी १५ ३०पत्ता कोबी १० २०भेंडी ३० ६०कारले ३० ६०चवळी शेंग२० ४०गवार शेंग ३० ६०पालक १० २०मेथी ३५ ६०कोहळ १० २०फणस ४० ७०कैरी ३० ६०