नागपूर : जवळपास दोन वर्षांपासून स्कूल बसेस बंद आहेत. बसेस सध्या जागेवर उभ्या आहेत. मालक आणि चालकांचे हाल सुरू आहेत. जगणे कठीण झालेल्या या दिवसात आता काहींनी नाईलाजाने स्कूल बसमधून भाजीपाला, फळे, मास्क, भांडी विकण्याचे काम सुरू केले आहे. बहुतेक सर्वांच्याच वाहनांवर कर्ज आहे. ते फेडण्याची ऐेपत राहिलेली नाही. सरकार मदत द्यायला तयार नाही. शालेय विद्यार्थी वाहतूक व्यवसाय बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून अध्यक्ष चंद्रकांत जंगले यांनी आतापर्यंत २०० वर निवेदने दिली. मंत्र्यांपासून महापौर, आयुक्तांपर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या. इतरांना मदत देता तशी चालक, मालकांसाठी मागितली. पैसा देऊ शकत नाही तर निदान काम तरी द्या, अशी मागणी करूनही ऐकण्याची मानसिकता कुणाचीही नाही. आज शहरात २० हजार चालक-मालकांवर वाईट वेळ आली आहे. अनेकांनी मजुरीचा तर काहींनी चिल्लर व्यवसायाचा मार्ग स्वीकारला आहे.
...
जिल्ह्यातील एकूण शाळा - ४,१११
एकूण स्कूल बसेस - १०,०००
...
असा होतोय स्कूल बसचा वापर
१) सुयोग चव्हाण मागील १० वर्षापासून स्कूल व्हॅन चालवतात. दोन वर्षापूर्वी दोन नव्या व्हॅन स्कूल बससाठी खरेदी केल्या. शाळा बंद पडल्याने आता ते स्वत: त्यातून बेलतरोडी रस्त्यावर भाजीपाला विकतात. सरकारही मदतीला आले नाही. नाईलाजाने हा मार्ग स्वीकारला.
२) त्रिमूर्ती नगरात राहणारे नितीन आवळे यांनी अडीच वर्षापूर्वी स्कूल बससाठी व्हॅन खरेदी केली. आज त्याच व्हॅनमधून फळे विकण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. एनआयटी गार्डनच्या बाजूला बसून दिवसभर व्यवसाय करतात. माल खपला नाही तर अंगावर पैसे बसतात.
...
गाडीवरील कर्ज कसे फेडणार? (स्कूलबस मालकाच्या प्रतिक्रिया)
१) पाच व्हॅन आणि स्कूल बसच्या माध्यमातून व्यवसाय होता. आता शाळा बंद पडल्या. व्यवसाय बुडाला. फायनान्सरचे हप्ते थकले. त्यांचे फोनवर फोन येतात. मदतीची याचना करूनही सरकारने मनावर घेतले नाही. आता पापड, मसाले विक्री व्यवसाय करण्याची पाळी आली.
- नितीन पात्रीकर, मानेवाडा.
२) कर्जाच्या पैशावर व्हॅन आणि विंगर खरेदी केली. या स्कूल बसमधून भाग्य उजळेल वाटले होते. व्यवसाय ठप्प पडला. दोन्ही वाहने उभी आहेत. कर्जाचे हप्ते वाढतच चालले आहेत. ते कसे फेडायचे हे समजत नाही. आता खाजगी रोजीचे काम करण्याची वेळ आली आहे. मुलगाही बेरोजगार झाला आहे.
- एकराम गुरनुले, वानाडोंगरी.
...
४) चालकांचे हाल वेगळेच (स्कूल बस चालकांच्या प्रतिक्रिया)
१) हातचे काम सुटले. कुटूंब कसे पोसायचे? सहा महिन्यापासून इलेक्ट्रिक फिटींगच्या कामावर हेल्पर म्हणून जातो. कधी काम मिळते, कधी नाही. कुटुंबाची गुजराण भागत नाही. गरिबांचा कुणी वाली नाही.
- श्याम धानोरकर, बेसा
२) शाळा सुरू असताना काळजी नव्हती. आता समस्या संपता संपत नाही. काम बंद पडल्याने खाजगी कामाला रोजीने जातो. रोज काम मिळेलच याची शाश्वती नाही. कसेबसे कुटुंबाला जगवत आहे.
- पांडुरंग बेलतरे, देवळी सावंगी
...