नागपूर : सध्या पेरणीचा हंगाम असल्याने कळमना आणि कॉटन मार्केट ठोक बाजारात स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले असून गृहिणींचे किचनचे बजेट बिघडले आहे. बहुतांश भाज्या अन्य जिल्ह्यातून येत आहेत. गणेशोत्सवापर्यंत गृहिणींना भाज्या महागच मिळणार आहे. ठोक बाजारापेक्षा किरकोळमध्ये भाज्या दुप्पट भावात विकल्या जातात. त्यामुळे ५०० ते ६०० रुपयांच्या भाज्या एका थैलीत येत असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे.
स्थानिकांकडून आवक कमी, ठोकमध्ये भाज्या आटोक्यात
महात्मा फुले भाजी व फ्रूट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, सध्या स्थानिकांऐवजी बाहेरून भाज्याची जास्त आवक आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने जुलैमध्ये भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. किरकोळमध्ये भाव दुप्पट आहेत. सध्या हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू झाल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे. फूल कोबी नाशिक, बुलडाणा, औरंगाबाद, कोथिंबीर नांदेड, पंढरपूर, उमरानाला, सौंसर, टोमॅटो बेंगळुरू, तोंडले व परवळ रायपूर, भिलई, दुर्ग, दिल्लीहून बिन्स शेंगा, हिरवी मिरची यवतमाळ येथून विक्रीला येत आहे. शेतकरी पेरणीच्या कामात गुंतल्याने भाज्यांच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ भाज्यांचे पीक घेणारे शेतकऱ्यांनी लागवड सुरू केली आहे. पुढील १५ दिवसात स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक बंद होणार आहे. त्यानंतर भाज्यांच्या किमतीत आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या ५० गाड्यांची आवक आहे.
रविवारी किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांच्या किमती प्रति किलो ४० ते ६० रुपयांदरम्यान होत्या. बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने भाव आटोक्यात आहेत. किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये किलो भाव आहेत. फूल कोबी ५० ते ६० रुपये आणि हिरवी मिरची ६० रुपयांवर पोहोचली आहे.
रविवारी किरकोळ बाजारात भाज्यांचे दर :
वांगे ३०, फूल कोबी ५० ते ६०, पत्ता कोबी ४०. हिरवी मिरची ६०, टोमॅटो ३०, कोथिंबीर ६०, सिमला मिरची ५०, चवळी शेंग ४०. गवार ४०. कारले ४०. ढेमस ६०, परवळ ६०, बीन्स शेंग ८०, वाल शेंग ६०, कोहळे ४०. लवकी ३०, पालक ४०. मेथी ८०, चवळी ४०. मुळा ३०, काकडी ३०, गाजर ४०. फणस ६०, कैरी ६०, दोडके ४०. भेंडी ४०. तोंडले ४०.
किरकोळमध्ये कांदे महागच
पावसामुळे कांदे खराब झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाव वाढले आहेत. कळमन्यात लाल कांदे बुलडाणा, अहमदनगर, जळगाव येथून तर पांढरे कांदे अकोला आणि अमरावती जिल्ह्यातून येत आहेत. पांढरे कांदे ६ ते ७ ट्रक येत असून उत्तम दर्जाचे कांदे १७ ते १८ रुपये तर लाल कांदे १८ ते २० रुपये असून उत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव २० रुपये किलो आहेत. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू झाल्याने मालाचा उठाव चांगला आहे. कळमन्यात ठोक बाजारात भाव आटोक्यात असले तरीही किरकोळमध्ये दुप्पट भावात विक्री होत असल्याचे कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले. पांढऱ्या कांद्याची विक्री विदर्भ आणि हैदराबाद येथे होते. संपूर्ण भारतात लाल कांद्याला जास्त मागणी आहे. कळमन्यातून नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा जिल्हा आणि आंध्रप्रदेशात कांद्याची विक्री होते.
बटाट्याचे भाव ठोकमध्ये १० ते १२ रुपये असून आग्रा आणि कानपूर येथून आवक आहे. कळमन्यात दररोज १८ ते २० गाड्या येत आहेत.