लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : काेराेनासंक्रमित जावयास हाॅस्पिटलमध्ये पैसे नेऊन दिल्यानंतर गावाला परत येत असलेल्या तरुणांच्या माेटरसायकलला भरधाव वाहनाने जाेरात धडक दिली. त्यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड-भिसी (जिल्हा चंद्रपूर) मार्गावरील मालेवाडा शिवारात बुधवारी (दि. ५) रात्री ९ च्या सुमारास घडली.
जगदीश भगवान चौधरी (वय ३०) असे मृताचे, तर विशाल मधुकर डडमल (३५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, खापरी, ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. विशालचे जावई काेराेनासंक्रमित असल्याने त्यांना नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना पैशाची गरज असल्याने दाेघेही त्यांना पैसे नेऊन देण्यासाठी नागपूरला गेले हाेते. पैसे दिल्यानंतर रात्री त्यांनी एमएच-३४/एजी-९७९४ क्रमांकाच्या माेटरसायकलने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
दरम्यान, ते मालेवाडा (ता. भिवापूर) शिवारात पाेहाेचताच एमएच-१४/जीए-०४१४ क्रमांकाच्या वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, जगदीशचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी विशालला उपचारासाठी, तर जगदीशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला.
याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी वाहनचालकाविरुद्ध भादंवि ३०४ (अ), २७९, ३३७, ३८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.