लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : अट्टल वाहन व माेबाइल चाेरट्यात अटक करण्यात कामठी (नवीन) पाेलिसांना यश आले. त्याच्याकडून एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. ५) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कामठी-घाेरपड मार्गावर करण्यात आली.
दिनेश गणेश तडसे (२०, रा. अब्दुल्ला शाहबाबा दर्गा, कामठी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. सौरभ दिलीप रामटेके (२२, रा. जयभीम चौक, कामठी) हा गुरुवारी रात्री कळमना टी पाॅईंट परिसरातून जयभीम चाैकाकडे अर्थात घरी जात हाेता. दिनेशने साैरभच्या खिशातून माेठ्या काैशल्याने माेबाइल काढून घेत पळ काढला. त्यामुळे साैरभने त्याचा माेबाइल चाेरीला गेल्याची तक्रार पाेलिसांत नाेंदविली हाेती. कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासात घेतले.
याच काळात कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक कामठी-घाेरपड मार्गावर गस्तीवर असताना त्यांना दिनेश एमएच-४०/एसआर-६५१७ क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जाताना दिसला. संशय आल्याने पाेलिसांनी त्याला थांबवून त्याच्या दुचाकीची डिक्की तपासली. त्यात पाेलिसांना माेबाइल आढळून आला. पाेलिसांनी त्याला माेबाइल अनलाॅक करण्याची सूचना दिली. त्याला फाेन अनलाॅक करता न आल्याने कसून विचारपूस केली. त्याने चाेरीची कबुली देताच पाेलिसांनी त्याला अटक केली. ताे अट्टल वाहन व माेबाइल चाेर असून, त्याच्याकडून दुचाकी व माेबाइल असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. ही कारवाई हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, संदीप गुप्ता यांच्या पथकाने केली.