नागपूर : जागतिक ‘नाे हाॅर्न डे’चे औचित्य साधून वाहतूक जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या जनआक्राेश संघटनेच्या वतीने आभासी वेबिनारचे आयाेजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित नीरीचे प्रधान वैज्ञानिक डाॅ. रितेश विजय यांनी ध्वनिप्रदूषणाच्या व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या संशाेधनाची माहिती दिली. त्यांनी वाहनामध्ये स्पीडाेमीटरप्रमाणेच हाॅर्नची मर्यादा कळण्यासाठी चालकाचा सेल्फ हाॅर्नमीटर डॅशबाेर्ड असायला हवा, अशी नाविन्यपूर्ण कल्पना सुचविली. त्यांनी हाॅर्नची अधिकतम मर्यादा ११२ डेसिबलवरून १०० डिबीवर करण्याचेही आवाहन केले.
वेबिनारमध्ये रस्ते सुरक्षा समितीचे चेअरमन, खासदार डाॅ. विकास महात्मे प्रामुख्याने उपस्थित हाेते. ऐझवालप्रमाणे नागपूरही ‘नाे हाॅर्न सिटी’ व्हावी, अशी भावना व्यक्त केली. ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी नीरी आणि जनआक्राेश यांनी संयुक्तपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जनआक्राेशचे उपाध्यक्ष करंदीकर यांनी वाहतूक जनजागृतीसाठी संघटनेतर्फे गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याबाबत माहिती दिली. संचालन डाॅ. मुकुंद पैठणकर यांनी केले. जनआक्राेशचे अध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी आभार मानले.