लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र व मध्यप्रदेशात वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा भंडाफोड करत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.
सुरेश वडगुजी खंडारे (५२, अंबाझरी) हे ३ मार्च रोजी क्रेझी कॅस्टलजवळ महाप्रसाद घेण्यासाठी गेले असता अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी चोरली होती. बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेकडूनदेखील समांतर तपास सुरू होता. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी समीर राजू नाईक (२७, जोगीनगर, अजनी), पंकज विजय यादव (२१, नरेंद्रनगर), निशांत सुकेश पाली (१९, नारा रोड), हर्षदीप उर्फ हर्ष देवानंद गौरखेडे (२२, सावनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी विलास गजभिये व अंचल सरातेसोबत वाहन चोरल्याची कबुली दिली.
त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरमधून एमएच ४९ आर ४४११, धंतोलीतून एमएच ३१ एफटी ६१४६, कोराडीतून एमएच ३१ एएस ५२८६, मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून एमपी २८ एमझेड ६३७१, सौंसरमधून एमपी २८ एसजी ७६९४ अशा आणखी पाच दुचाकी चोरल्याचीदेखील माहिती दिली. त्यांच्या ताब्यातून वाहने जप्त करण्यात आली असून त्यांना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, सचिन भोंडे, बबन राऊत, सुनित गुजर, हेमंत लोणारे, सुशांत सोळंके, मनोज टेकाम, रविंद्र राऊत, नितीन बोपुलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.