विजय भुते
पारशिवनी : तालुक्यातील बहुतांश रस्त्यावर ठिकठिकाणी ‘यू टर्न’ आहेत. या ठिकाणी सुसाट वेगाने येणारी वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडतो. रत्यावरील ओव्हरलोड वाहने, सुसाट वेगाने धावणारी वाहने, मद्य प्राशन करून चालविणारी वाहने, अवैध गौण खनिजांची वाहतूक करणारी वाहने यावर कुणाचेच नियंत्रण उरले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र संबंधित विभागाच्या अधिकारी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.
पारशिवनी पेंच मार्गावरील ‘यू टर्न’वर एक कार पलटून त्यात कारचालकाचा मृत्यू झाला. यात मद्यपान करून वाहन चालविणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे व रस्त्यावरील टर्निंग या सर्व घटना अंतर्भूत होत्या. अशा अनेक घटना ठिकठिकाणी वारंवार घडून अनेकांचा हकनाक बळी जात आहे. या घटनात वाहनचालकाचा काही प्रमाणात दोष आहे, पण सोबतच बांधकाम विभाग, पोलीस विभाग, वाहतूक विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी हे देखील दोषी आहेत.
रस्त्यावरील खड्डे, हब, यू टर्न, रस्त्यावर आलेली वृक्षवेली याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना विविध राजकीय पक्ष, ग्रामस्थ व वृत्तपत्रातील बातम्यातून वारंवार कळविण्यात येत आहे. परंतु अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. एखादा रस्ता बनविणे किंवा दुरुस्ती करून बिल काढणे व कमिशन घेऊन मोकळे होणे एवढेच त्यांचे काम उरले आहे. तालुक्यातील रामटेक-सावनेर मार्गावरील नयाकुंड येथील ‘यू टर्न’ बाबत वारंवार निवेदन देऊनदेखील योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.
पारशिवनी-खापरखेडा मार्ग, रामटेक-सावनेर मार्ग, आमडी फाटा-कन्हान मार्ग, कन्हान-तारसा मार्ग, पालोरा-सिंगोरी मार्गाने नेहमी ओव्हरलोड वाहने धावताना दिसून येतात. ही वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे कित्येकदा वाहने उलटून अपघात घडतो. कधी कधी परस्पर विरोधी दिशेने येणाऱ्या वाहनांची आपसात धडक होते. वाहनांना ओव्हरटेक करताना समोरच्या वाहनास टक्कर होऊन अपघात घडतो. यात अनेकांचा जीव जातो. या ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
तालुक्यात पारशिवनी व कन्हान येथे पोलीस ठाणे आहे. तालुक्यातील सर्व मुख्य रस्त्याने अवैध रेती, कोळसा,मॅगनिज, जनावरे, डिझेल, कबाडी, गांजा, दारूची वाहतूक होते. ही वाहने सुसाट वेगाने धावतात, त्यामुळेदेखील अपघात घडतो. ही वाहतूक सहसा सकाळी व रात्रीच्या वेळी सुरू असते. मात्र दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात.
असे झाले अपघात
पारशिवनी पोलीस स्टेशनअंतर्गत २०१६ मध्ये १२, २०१७ मध्ये ७, २०१८ मध्ये ११, २०१९ मध्ये १०, २०२० मध्ये १४ भीषण अपघात झाले. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत १७ अपघात झाले. कन्हान पोलीस स्टेशनअंतर्गतदेखील अनेक अपघाताची नोंद आहे.
आधी हे करा...
आमडी ते कन्हान रस्त्यावरील जुन्या टोलनाक्याजवळ, तारसा चौकात व पालोराजवळील पेट्रोल पंपाजवळ पोलीस नियमित उभे दिसतात. त्यांनी वसुलीपेक्षा भरधाव वाहनांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे, ‘यू टर्न’ दुरुस्त करणे आवश्यक आहे.
260821\img_20210826_160204.jpg
ओवरलोड वाहतूक