लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरक्षेसाठी आणि नंबर प्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १ एप्रिलपासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) लागणार होत्या. परंतु राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवापुरवठादाराकडून वाहन डीलरला या नंबर प्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. यामुळे वाहन विकत घेऊनही ग्राहक नव्या नंबर प्लेटपासून वंचित आहे.वाहने चोरी, वाहन अपघात व गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ महत्त्वाची ठरणार आहे. हायटेक टेक्नॉलॉजी वापरून बनविण्यात आलेल्या या नंबर प्लेटवर ‘इलेक्ट्रॉनिक चिप’ तसेच ‘सेन्सॉर’ आहे. यात वाहनधारकांची संपूर्ण माहिती असणार आहे. सेन्सॉरमुळे याचा गैरवापर होत असेल तर संबंधित प्रशासनाला याची माहिती लगेच मिळणार आहे. चोराने वाहनाची नंबर प्लेट काढण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसा संदेश संबंधित वाहनमालकाच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनाचा तपास लवकर होण्यास मदत होणार आहे. १ एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या सर्व नव्या वाहनाना ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. या शिवाय वाहनाची नोंदणी होणार नाही. परंतु आता मे महिन्याचा दुसरा आठवडा संपायला आला असतानाही अद्यापही वाहन डीलर्सकडे नव्या नंबर प्लेट उपलब्ध झाल्या नाहीत. या नंबर प्लेट राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवापुरवठादारांकडून डीलर्सला मिळणार होत्या. तर डीलर्स वाहनावर नंबरप्लेट जोडून व नंबर टाकून देणार होते.नंबर प्लेट्स ‘टॅम्परप्रूफ’अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात येणाऱ्या या नंबर प्लेट्स ‘टॅम्परप्रूफ’ असणार आहेत. आरटीओच्या परवानगीशिवाय या नंबर प्लेट्स कुणालाही बदलविता येणार नाही. ज्याप्रमाणे बारकोडचा वापर परीक्षांमध्ये केला जातो, अगदी त्याच पद्धतीने या नंबरप्लेट्सवरील प्रत्येक अक्षर हे त्या वाहनाची ओळख पटविण्यासाठी ‘युनिक आयडेंटीटी’ कोड असणार आहे.नंबर प्लेट ओळखण्यासाठी असणार ‘स्कॅनर’‘इन्फ्रारेड’च्या पद्धतीने ‘हायसिक्युरीटी नंबर प्लेट’वरील सांकेतिक माहिती ही पाहण्यासाठी पोलीस आणि आरटीओजवळ स्कॅनर असणार आहे. दुरूनही नंबर प्लेट स्कॅन करता येणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची माहिती तातडीने मिळणार असल्याने याची मोठी मदत पोलिसांना होणार आहे.