लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : दिनेश कोळसा खदान क्रमांक तीन या परिसरातील सुमारे ३०० एकर शेती वेकोलि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रभावित होण्याच्या मार्गावर आहे. वेकोलिने शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा रस्ताच बंद केल्याने असंख्य शेतकऱ्यांसमोर बिकट समस्या निर्माण झाली आहे. वेकोलिने रस्ताच बंद केल्यामुळे पिकांना फटका बसण्याची भीती शक्यता आहे.
उमरेड क्षेत्र अंतर्गत मकरधोकडा येथून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दिनेश खाण क्रमांक ३ आहे. याठिकाणी कोळसा साठवणूक सुद्धा केली जाते. या परिसरात गनपावली, बोपेश्वर आणि कटारा अशी एकूण तीन रिठी गावे आहेत. या परिसरात सुमारे ३०० एकरात सोयाबीन, कपाशी आणि धान पिकांचा पट्टा आहे. मकरधोकडा येथील शेतकऱ्यांना दिनेश खाण परिसरातूनच रस्ता ओलांडून आपल्या शेताची वाट धरावी लागते. कोळसा खाणच शेतालगत असल्याने पिके काळवंडतात. कोळसा खाणीची धूळ, ब्लास्टिंग आणि कोळशाची भुकटी यामुळेही पिकांचे अतोनात नुकसान होते. अशातच वेकोलिने पिढ्यानपिढ्या शेताकडे जाणारा मार्गच बंद करून टाकल्याने शेतकऱ्यासमोर शेतात जाण्याचा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. तातडीने रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी विजय झोडे, बाबा बेलकुडे, राजू कावटे, भास्कर झोडे, शेषराव श्रीखंडे, माणिक झोडे, ताराचंद श्रीखंडे, दिलीप चौके, एकनाथ झोडे, देवराव बेलकुडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
भूमिगत बोगदा आणि रेल्वे गेट
उमरेड वेकोलि ते बुटीबोरी असा कोळसा वाहतुकीचा रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गावर ब्रिटिशकालीन रेल्वे गेट क्रमांक ३ असून या मार्गावरून सुद्धा शेतकऱ्यांना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय भूमिगत बोगदासुद्धा तयार करण्यात आला आहे. येथूनही जायचे नाही असा फतवाच वेकोलि अधिकाऱ्यांनी काढला आहे. वेकोलिच्या या संपूर्ण प्रकारामुळे आम्हास ८ ते १० किलोमीटरचा वळसा घेत शेत गाठावे लागते, अशी कैफियत शेतकऱ्यांची आहे. यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.