नागपूर : जातीय व्यवस्थेच्या कुचंबणेतून आत्महत्या करणारा हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अन्याय अत्याचार निवारण समन्वय समितीच्यावतीने संविधान चौक येथे संकल्प सभा घेण्यात आली. समता सैनिक दल, मानवी हक्क संरक्षण मंच, आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन हैदराबाद यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. रोहित वेमुलाच्या प्रतिमेला अभिवादन करून अनुपकुमार, उषा बौद्ध, अॅड. स्मिता कांबळे, शिरीष फुलझेले, राजू कांबळे आदींनी मार्गदर्शन करीत वेमुला मृत्यूनंतर हैदराबाद विद्यापीठातील आंदोलनकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायपूर्ण स्थितीवर प्रकाश टाकला. विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव यांना बडतर्फ करण्यासह रोहितचा सहकारी प्रशांत दोन्ता व इतरांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे तसेच देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये जातीव्यवस्थेमुळे होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलन उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. संकल्प सभेला हितेश उके, आशिष नंदागवळी, ललित उके, शवतनिशा टेंभुर्णे, हर्षिता खोब्रागडे, सुमित कांबळे, योगेश गवई, आशिष रामटेके, रितेश देशभ्रतार, तुफान कांबळे, प्रशांत तांबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.(प्रतिनिधी) विविध संघटनांचेही अभिवादन रोहित वेमुलाच्या प्रथम स्मृतिदिनी विविध संघटनांच्यावतीने त्यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. यामध्ये डीवायएफआय, सीटू, किसान सभा, गजर सांस्कृतिक मंच, जातीअंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. शैक्षणिक संस्थांमध्ये मागास विद्यार्थ्यांना संरक्षण देण्यासाठी रोहित अॅक्ट पारित करणे, रोहितच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेले दोन केंद्रीय मंत्री, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू व इतरांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी दिलीप देशपांडे, विप्लव मेश्राम, अशोक सरस्वती, दीपक डोंगरे, अरुण लाटकर यांच्यासह मो. ताजुद्दीन, भीमराव चिकाटे, मधुकर भरणे, संकेत चौधरी, रंजना मेश्राम, विजया जांभुळकर, शालिनी राऊत, सरिता शहू, संजय रणदिवे, देवीदास रंगारी, सुरेश परतेती, रमेश वाजगी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन रोहित वेमुला याच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडन्ट्स फेडरेशनच्या सदस्यांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधान चौक येथे झालेल्या अभिवादन सभेला २०० च्यावर विद्यार्थी सहभागी झाले होते. रोहित वेमुलाचे तैलचित्र काढून व मेणबत्ती जाळून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करताना हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव यांना बडतर्फ करणे तसेच रोहित अॅक्ट त्वरित पारित करण्याची मागणी केली. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सिद्धांत भरणे, सचिव आशिष खोब्रागडे, अतुल खोब्रागडे, निखिल रामटेके, राहुल धारिक, अनुप मेश्राम, जीवन बावणे, अमोल चिमणकर, विनोद उके, विनीत नागदेवे, आम्रपाली हाडके, योगेश बावनकर, अमित ढेंगरे, सोनू मेश्राम आदी उपस्थित होते.
वेमुलाच्या स्मृतिदिनी संकल्प सभा
By admin | Published: January 23, 2017 1:53 AM