नागपूर : १० जानेवारी २०१५ चा तो प्रसंग. ‘फ्लाईंग सिख’ मिल्खासिंग यांना अकोला येथे आयएमएच्या वॉकथॉनसाठी अकोला येथे आमंत्रित करण्यात आले होते. संजय सुरेका यांच्या पुढाकारातून हे आयोजन करण्यात आले. आदल्या दिवशी मिल्खासिंग यांचे विमान दिल्लीहून निघाले. सायंकाळी ५.३० ला अकोला विमानतळाच्या आकाशात पोहोचले देखील. नियंत्रकाने मात्र लँडिंगला समस्या येत असल्याचे सांगून तसेच विमानात महान मिल्खासिंग असल्याचे कळताच विमान उतरविण्यास नकार दिला. इतक्या महान खेळाडूबाबत मी कुठलीही जोखीम पत्करू इच्छत नाही, असे त्यांनी नम्रपणे सांगितले.
यानंतर नागपूर विमानतळावर विमान उतरविण्याची आणि विमानासाठी हँगर मागण्याची त्यांनी सूचना केली. त्यानंतर वेगवान सूत्रे फिरली. तत्कालिन केंद्रीय मंत्री व सध्या उपराष्ट्रपती पदावर विराजमान असलेले व्यंकय्या नायडू यांच्या कानावर ही वार्ता पडली. त्यांनी नागपूर विमानतळाशी संपर्क साधून विमान उतरविण्याची आणि थांब्याची व्यवस्था केली. त्याचवेळी विमानतळाशेजारच्या हॉटेलमध्ये या महान खेळाडूंचे वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ११ जानेवारीला सकाळी ६.४५ ला मिल्खासिंग यांचे अकोला येथे सुखरूप आगमन झाले, त्यावेळी आयोजकांची ही धडपड ऐकून ते देखील आश्चर्यचकित झाले होते. विदर्भ कॅरम संघटनेचे महासचिव प्रभजितसिंग बच्छेर यांनी या स्मृतींना उजळा दिला आहे.