नागपूर : मनपाच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी कचरा संकलन व्यवस्थेवरून आजी आणि माजी महापौरांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
नगरसेविका परिणीता फुके यांनी कचरा संकलन केंद्रावरून उपस्थित केलेला मुद्दा माजी महापौर नंदा जिचकार यांनी उचलून धरला. केवळ एकाच प्रभागाची ही परिस्थिती नाही तर संपूर्ण शहरात असेच हेच हाल असल्याचे सांगितले. रस्त्यावरील कचरा तसाच पडून राहात असल्याचा आरोप केला.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी कंपनीच्या कंत्राटात ट्रान्सपोर्ट स्टेशन नमूद असल्याचे सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. त्यात विरोधकांनीही कचरा संकलनावर नाराजी व्यक्त केली. यावर महापौरांनी निर्देश तर दिले. सोबतच माजी पदाधिकाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढविला. महापौर म्हणाले, ज्या स्थायी समिती सभापतींच्या काळात या निविदा झाल्या आणि ज्या सभापतींनी त्या मंजूर केल्या त्यांच्यासह या काळात जे महापौर होते ते कंपनीच्या कारभारावरून प्रश्न विचारत आहे. वेळीच काम झाले असते तर मला निर्देश देण्याचे सौभाग्य लाभले नसते, असे म्हणत महापौरांनी माजी महापौरांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.