नागपूर : ॲड. सतीश उके यांना ईडीने अटक केल्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सतीश उके हे माझे वकील आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर ईडीने कारवाई केली असल्याचा आरोप पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात केला. तर फडणवीस यांनी हे आरोप फेटाळत उके यांच्यावर नागपूर पोलिसांनी आधीच गुन्हा दाखल केला असून, त्याच पीडित व्यक्तीने ईडीकडेही तक्रार केली असल्याचा दावा केला आहे.
पटोले म्हणाले, राज्यात कॉंग्रेसचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे आता पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध दाखल याचिकेमध्ये ॲड. उके यांनी बाजू मांडली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. उके हे वकील आहेत. उद्या ते भाजप नेत्यांचीही बाजू न्यायालयात मांडू शकतात. परंतु या प्रकरणात आपले नाव जाणीवपूर्वक जोडले जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. दहशतवाद किंवा अमली पदार्थांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी ईडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आता कोणतेही प्रकरण ईडीकडे सोपविले जाते. भाजपने ईडीचे महत्त्वच संपविले आहे, अशी टीका त्यांनी केली.
पटोलेंच्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले, एका जमीन व्यवहार प्रकरणात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ईडीकडे तक्रार केली होती. त्या आधारावर ईडीने कारवाई केली आहे. ॲड. उके यांना न्यायाधीशांचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजाची मते घेण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा लागली आहे. अल्पसंख्याक मतांसाठी दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.