लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये बदल करून १७६ रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली, परंतु अजनी येथील कंटेनर डेपोत निर्जनस्थळी हे कोच ठेवल्यामुळे रुग्णांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, अनेक रुग्णांना बेड मिळण्यास अडचण जात होती. बेड मिळाला, तरी ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वेच्या कोचमध्ये आवश्यक तो बदल करून, १७६ रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली. २ मे रोजी रेल्वेने महापालिकेला हे कोच सोपविले. सुरुवातीला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक ८ वर हे कोच ठेवण्याचा विचार होता, परंतु त्यानंतर अजनी येथील कंटेनर डेपोत हे कोच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेच्या या कोचमध्ये ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली, परंतु अजनी कंटेनर डेपो हे निर्जन स्थळ असल्यामुळे रुग्ण तेथे उपचार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे रेल्वे कोचमधील कोविड केअर सेंटरला रुग्णांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. मागील १३ दिवसांत केवळ २५ रुग्णांनीच येथे उपचार घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे हे कोच ठेवण्याची जागा बदलल्यास या कोविड केअर सेंटरला रुग्णांचा प्रतिसाद मिळेल, असे मत रेल्वेतील जाणकारांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.