ठळक मुद्देपक्षीमित्रांनी केले वनविभागाच्या हवाली
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिशय दुर्मिळ आणि जवळजवळ नामशेष होत चाललेला तणमोर पक्षीव्हीसीए जामठा क्रिकेट स्टेडियममध्ये आढळला. पक्षीतज्ज्ञांनी ही तणमोर मादी असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीही हा पक्षी मिहानच्या परिसरात आढळून आल्याने हा परिसर तणमोरचे अधिवास असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हा पक्षी वनविभागाकडे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तणमोरच्या दिसण्याने पक्षीप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.मंगळवारी जामठाच्या कर्मचाऱ्यांना मैदानात हा पक्षी दिसून आला. यावेळी एक मांजर या पक्ष्याच्या मागे लागले होते. इतरांपेक्षा वेगळा असल्याने त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. या कर्मचाऱ्यांनी लगेच पक्षीमित्र पारशी अमरोलीवाला यांना फोनवर याबाबत माहिती दिली. त्यांनीही लगेच स्टेडियम गाठले. अमरोलीवाला यांनी ओळख पटविण्यासाठी त्याचे काही फोटो काढून पक्षीतज्ञ अविनाश लोंढे व विनीत अरोरा यांना पाठविले. त्यांनी फोटो पाहून हा मादी जातीचा दुर्मिळ तणमोर आहे असे शिक्कामोर्तब केले. त्यानंतर या पक्ष्याला सुरक्षित ताब्यात घेतले व वनविभागाच्या स्वाधीन केले. सध्या हा पक्षी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन व मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांच्या नियंत्रणाखाली आहे. लवकरच त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.हा पक्षी दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनचे पक्षीतज्ज्ञ आॅगस्ट महिन्यात कारंजा आणि वाशिम भागात तणमोरच्या सर्वेक्षण व अभ्यासासाठी येणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी मिहान परिसरात तणमोर हा पक्षी आढळला होता. यावरून येथेही तणमोर पक्ष्याचा अधिवास असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संस्थेने या क्षेत्रातही या पक्ष्याविषयी अभ्यास करण्यासाठी यावे, असे पत्र या संस्थेला पाठविणार असल्याचे कुंदन हाते यांनी सांगितले.तणमोरविषयी जाणून घ्यातणमोर पक्षी साधारणत: ४५ सें.मी. आकाराचा, कोंबडीएवढा असतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात मात्र वीण काळात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजूने एक तुरा येतो तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. यांचे शेपूट आखूड असते. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसते. दगडाळ झुडपी जंगले या ठिकाणी राहतो.जवळजवळ नामशेष झालेला हा पक्षी पूर्वी आंध्रप्रदेशातील पेन्नार आणि गोदावरीच्या खोऱ्यातील दगडाळ प्रदेशातील झुडपी जंगलात आढळून आला होता. १९९० नंतर हा पक्षी पुन: दिसून आला नाही. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. तणमोर हे उंच गवताळ भागात आणि शेताच्या प्रदेशात सहसा एकटे राहणे पसंत करतात.