नागपूर : रंगभूमीवर आपल्या दिलखेच अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर विलक्षण प्रभाव टाकणाऱ्यांपैकी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले एक होते. निळू फुले, श्रीराम लागू आणि विक्रम गोखले, यांच्या अदाकारीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, दोन संवादाच्या मधात किंवा कधीकधी एकाच वाक्यसंवादाला मधातच तोडून घेतलेले विशिष्ट अंतर (पॉज) होते. हे जे अंतर असायचे, त्यात त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन प्रेक्षकांना घायाळ करत असत. हे अंतरच प्रेक्षकांना संबंधित पात्राच्या मनातील गुंता किती तिव्र असेल, त्याच्या मनात कोणती चलबिचल चालली आहे, याची जाणिव करवून देणारे ठरत होते. विक्रम गोखले यांच्या निधनाने, या ‘पॉज’ तिकडीचा कदाचित अखेर झाला असेच म्हणावे लागेल.
विक्रम गोखले २०११-१२ मध्ये एका आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आले असता, खासगी भेटीत त्यांना ‘विक्रम गोखलेंचा पॉज म्हणजे काय असतो’ असा सवाल विचारला होता. तेव्हा त्यांनी ‘जरा थांब’ असे म्हणत, एक उच्च श्वास घेतला आणि त्या उच्च श्वासात त्यांच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन उफाळले गेले ते बोलके होते. त्यानंतर ‘तुला कळला का पॉज’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता. ‘हा पॉज विक्रम गोखलेचा वगैरे नसतो तर त्या पात्राच्या संवेदनेचा असतो. त्या पात्राच्या उचंबळलेल्या भावना केवळ आणि केवळ संवेदनशील मनालाच कळतात.
मराठी नाट्यरसिक संवेदनशील असल्यानेच त्याला ‘पाॅज’चे महत्त्व कळते’ असे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर ते संबंधित कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यावेळी त्यांच्या मनातील आंबेडकरी विचारांची निष्ठा आणि आंबेडकरी समाजाबद्दल आपुलकी व्यक्त केली होती. ही भावना व्यक्त करताना जातीभेद सोडा आणि सगळे एकोप्याने नांदा, असे आवाहनही त्यांनी केले होते. शेखर ढवळीकर लिखित व मंगेश कदम दिग्दर्शित ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचा शुभारंभ मुंबई किंवा पुणे येथून न करता नागपुरातून करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या नाटकाचे बरेच प्रयोग त्यावेळी पार पडले होते.
२०१५ मध्ये नागपुरातूनच रंगभूमीवरचे पुनरागमन
- १९ फेब्रुवारी २०१३ रोजी पेण येथे विक्रम गोखले यांनी आता आपण रंगभूमीवरून सन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, शेखर ढवळीकर यांचे ‘के दिल अभीं भरा नहीं’ हे नवे नाटक त्यांनी ऐकले आणि आपला तो निर्णय चुकला याची जाणिव त्यांना झाली. नाटकासाठी गोखले यांना विचारणा झालीतेव्हा त्यांनी लगेच होकार कळवला आणि सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाने त्यांचे रंगभूमीवर पुनरागमन झाले होते. या नाटकाद्वारे प्रथमच विक्रम गोखले व रिमा लागू ही जोडी रंगभूमीवर अवतरली होती. नाटकात जयंत सावरकरही महत्त्वाच्या भूमिकेत होते.