नागपूर: जम्मू-काश्मीरमधील रियासी भागात वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या श्रद्धाळूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात प्रतिकात्मक पुतळ्याला लावलेल्या आगीचा फटका कार्यकर्त्यांना बसला. यात तीन कार्यकर्त्यांना चांगलेच चटके बसले व थोडक्यात मोठी दुर्घटना टळली.
९ जून रोजी रियासी भागात वैष्णोदेवीला जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. याविरोधात विहिंप व बजरंग दलातर्फे आंदोलन पुकारण्यात आले होते. बडकस चौकात आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यांनी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणला. तो जाळण्यासाठी त्यावर पेट्रोल फेकण्यात आले. मात्र आग लावताच भडका उडाला व त्यामुळे पळापळ झाली. तीन कार्यकर्त्यांना आगीचे जोरदार चटके बसले व ते थोडक्यात बचावले. एका कार्यकर्त्याच्या दुपट्ट्याला आग लागली होती व ती इतरांनी लगेच विझवली. यानंतरदेखील कार्यकर्त्यांची दहशतवादी व त्यांना समर्थन करणाऱ्या तत्वांविरोधात नारेबाजी सुरूच होती.