नागपूर : लव्ह जिहादविरोधी कायद्यासंदर्भात विश्व हिंदू परिषद आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. लव्ह जिहादची प्रकरणे धर्मांतर कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे. महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि वसाहतींमध्ये विहिंपतर्फे लव्ह जिहादविरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार येईल, अशी माहिती विहींपचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी दिली. नागपुरात ते शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
अयोध्येत प्रभू रामाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे. हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने तयारी सुरू केली आहे. एकादशीला २० लाख तर रामनवमीला सुमारे ४० लाख भाविक अयोध्येत पोहोचले होते. अशा स्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला किती लोक पोहोचतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र ही संख्या भव्य असेल व त्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावर्षी विहींपची सदस्य संख्या ३४ लाखांवरून ७२ लाख झाली आहे. आता ही संख्या एक कोटींहून अधिक करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. प्रकल्पांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त करून एक हजार जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेदेखील त्यांनी सांगितले.
देशात संत आणि मंदिरांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरूबागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांना पाठिंबा देताना परांडे म्हणाले की लोक त्यांच्याकडे श्रद्धेने जात आहेत. मात्र काही लोकांकडून संत आणि मंदिरांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिथे जिथे हिंदू धर्म वाढताना दिसतो, तिथे हिंदूविरोधी शक्ती कार्यरत आहे. त्यांना हिंदू धर्माचा उत्कर्ष पाहावत नाही. अशावेळी असत्याचा आधार घेत हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो असा आरोप त्यांनी लावला.