लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुप्रतीक्षित व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएस अभ्यासक्रमाला सप्टेंबरपासून सुरुवात होत नाही तोच महिनाभरातच ‘एम्स’ला संचालकही मिळाले. मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांची या पदी वर्णी लागली. संचालक उपलब्ध झाल्याने जानेवारी महिन्यात बाह्यरुग्ण विभागाला (ओपीडी) सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे, केंद्रीय निवड मंडळाने नागपूर ‘एम्स’सोबतच आंध्र प्रदेश येथील मंगलागिरीच्या एम्सच्या संचालकपदी डॉ. मुकेश त्रिपाठी, तर पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील एम्सच्या संचालकपदी डॉ. दीपिका देका यांची नियुक्ती केली आहे. ही निवड पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.मिहानमधील २५२ एकरमध्ये ‘एम्स’ उभारले जात आहे. मात्र बांधकाम पूर्ण व्हायला सुमारे चार वर्षांचा कार्यकाळ लागणार आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये सप्टेंबर महिन्यापासून ‘एम्स’च्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. एमबीबीएसच्या ५० जागेवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. संचालक नसल्याने ‘एम्स’चे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार बक्षी हे काम पाहत होते. इमारतीचे बांधकाम, पद भरती व शैक्षणिक सत्राची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. आता कायमस्वरूपी संचालक उपलब्ध झाल्याने ‘एम्स’च्या विकासाला गती येणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: डिसेंबर २०१८ मध्ये ‘एम्स’चे पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.कोण आहेत डॉ. दत्तामेजर जनरल डॉ. विभा दत्ता या डीयू विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. ३० नोव्हेंबर १९८३ मध्ये त्या सैन्यातील वैद्यकीय सेवेत रुजू झाल्या. १९८६ मध्ये पुणे येथील ‘आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज’मधून पॅथालॉजीमध्ये ‘एमडी’ केले. सोबतच टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून ‘ट्यूमर हिस्टोपाथ’ व ब्रिटन येथील ‘क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल’मधून यकृत प्रत्यारोपण पॅथालॉजीचे प्रशिक्षण घेतले. एम्स दिल्लीमधून त्यांनी आॅन्कोलॉजी पॅथालॉजीमध्ये ‘पीएचडी’ केली. त्यापूर्वी त्या दिल्ली येथील कमांड हॉस्पिटलमध्ये २००९ ते २०११ पर्यंत पॅथालॉजी आॅन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख राहिल्या. नुकत्याच त्या याच हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाल्या. डॉ. दत्ता यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘सैन्य पदक’, ‘लष्कर प्रमुख’ आणि ‘वेस्टर्न कमांड’चे प्रमुख म्हणून गौरविण्यात आले.
विभा दत्ता यांच्याकडे नागपूर एम्सचे संचालकपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 8:26 PM
बहुप्रतीक्षित व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएस अभ्यासक्रमाला सप्टेंबरपासून सुरुवात होत नाही तोच महिनाभरातच ‘एम्स’ला संचालकही मिळाले. मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांची या पदी वर्णी लागली. संचालक उपलब्ध झाल्याने जानेवारी महिन्यात बाह्यरुग्ण विभागाला (ओपीडी) सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देएम्सच्या विकासाला मिळणार गती : जानेवारी महिन्यात ओपीडी सुरू होण्याची शक्यता