नागपूर : एकीकडे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राज्यपालांचा दाैरा तर दुसरीकडे पोलीस भवनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह राज्य मंत्रीमंडळातील सुमारे अर्धा डझन मंत्र्यांची शुक्रवारी सकाळपासून शहरात उपस्थिती राहणार असल्याने पोलिसांना बंदोबस्ताचे दुहेरी नियोजन करावे लागले आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू २९ एप्रिलला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते एनएडीटीला भेट देणार आहे. काही वेळ त्यांचा मुक्काम राजभवनात राहणार आहे. त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेसुद्धा राहणार आहेत. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या निमित्ताने शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्ताचे वेगळे तर उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या संबंधाने पोलिसांनी बंदोबस्ताचे दहेरी नियोजन केले आहे. त्यानुसार, आज पोलीस अधिकाऱ्यांच्या सकाळपासून मेरॉथॉन बैठका चालल्या.
दुपारी १.३० ते ३.४५ या वेळेत उपराष्ट्रपतींच्या दाैऱ्याची रंगिता तालिम (रिहर्सल) पोलिसांनी करून घेतली. त्यानुसार, अग्निशमन दल, अॅम्बुलन्ससह विविध विभागांचा समावेश असलेल्या वाहनांचा काफिला विमानतळ, राजभवन, एनएडीटी ते विमानतळ या मार्गावर धावल्या. या वेळी कोणत्या अधिकाऱ्याचे वाहन कुठे राहिल, कोण कुठे काय भूमीका बजावतील, त्यासंबंधानेही सूचना देण्यात आल्या.
दोन हजार पोलीस बंदोबस्तात तैनात-
शुक्रवारच्या या दाैऱ्याच्या बंदोबस्तासाठी ७५० वाहतूक शाखेच्या पोलिसांसह सुमारे २ हजार पोलिसांचा ताफा तैनात केला जाणार आहे. विमानतळ, राजभवन आणि एनएडीटी या मार्गावरची वाहतूक दाैऱ्याच्या वेळी रोखली जाईल.
जड वाहतूक बंद-
वाहतूक पोलिसांकडून दौऱ्याच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री ७ पर्यंत वर्धा ते नागपूर मार्गावरची संपूर्ण जड वाहतूक बंद करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त राहणार आहे.