जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरकर्जबाजारीपणामुळे कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गतवर्षीच्या तुलनेत शेतपीक नुकसान दुपटीने झाले आहे. गतवर्षी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांना ६६ लाख ८८ हजार रुपयांचा फटका बसला होता. यंदा १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत हा आकडा १ कोटी २४ लाख ६५ हजार रुपयापर्यंत पोहचला आहे. वनविभागाच्या वतीने गत आठवड्यात एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात ही माहिती पुढे आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती यात देण्यात आली आहे. २०१५-१६ या वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) वन्यप्राण्यांमुळे शेतपीक नुकसानीच्या १५८५ घटना घडल्या. यात १ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गत वर्षींच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. २०१४-१५ वर्षांत नुकसानीच्या १०३० घटना घडल्या होत्या. यात ४६ लाख ९ हजार रुपयाच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते. वन्यजीव आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी वनविभागाच्या वतीने विशेष उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. मात्र नुकसानीची आकडेवारी पाहता, या उपाययोजना किती व्यापक आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतपिकांसोबत पशुधन हानीच्या घटनातही वाढ झाली आहे. २०१५-१६ या वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) पशुधन हानीची २२४ प्रकरणे वनविभागाकडे नोंदविण्यात आली. वन्यप्राण्यांचा धोका कायमचरात्री जागली करणाऱ्या आणि शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा धोका आजही कायमच आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०१५-१६ वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) २० शेतकरी जखमी झाले. याच्या नुकसानभरपाईपोटी ४ लाख ३६ हजार अदा करण्यात आले. गत वर्षी जखमींची संख्या पाच इतकी होती. वन्यप्राण्यामुळे मनुष्य मृत्यूचे एक प्रकरण १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत पुढे आले आहे. यात संबंधिताच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
बळीराजा पुन्हा संकटात
By admin | Published: February 16, 2016 4:06 AM