आॅनलाईन लोकमतनागपूर : न्यायासाठी पीडित कुटुंबीय मंगळवारी दुपारी विधानभवन परिसरात आ. मेधा कुळकर्णी आणि पोलिसांच्या मदतीने धडकले. मुख्यमंत्र्यांसमोर समस्या मांडण्याचा त्यांचा हट्ट होता. पण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन देत औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.पीडित कुटुंबीय औरंगाबाद जिल्ह्याच्या खुल्ताबाद तालुक्यातील सारई गावचे रहिवासी आहेत. कुटुंबातील सहा वर्षीय बालिकेवर गावातील किरण नामक १९ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने जमिनीची बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून जामीन मिळविला. या प्रकरणी न्यायालय आणि पोलीस ठाण्याच्या चकरा मारूनही आरोपीला अटक होत नसल्यामुळे हे कुटुंब व्यथित आहेत. त्यामुळेच त्यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर व्यथा मांडण्याचा निर्णय घेतला.अपेक्षेप्रमाणे ते मंगळवारी विधानभवनाबाहेर धडकले. आमदारांच्या शिफारसपत्राशिवाय मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नसल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना परिसरात प्रवेश नाकारला. नाईलाजाने त्यांनी विधानभवनाबाहेरच मीठा नीम दर्गा परिसरात लहान मुलगा व मुलीसह ठिय्या मांडला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय जाणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. ही बाब सत्ताधारी भाजपा आमदार मेधा कुळकर्णी यांच्या कानावर गेली. त्यांनी विधानभवन परिसरातून बाहेर येत या कुटुंबीयांची भेट घेतली आणि पोलिसांकडून प्रकरणाची माहिती घेतली. अखेर पोलीस आणि महिला आमदाराच्या संवेदनशीलतेमुळे पीडित कुटुंबीयांना विधानभवन परिसरात प्रवेश मिळाला. त्यानंतर पोलिसांनी विशेष शाखेच्या माध्यमातून पीडित कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी भेट घालून दिली. पीडितांनी आपली बाजू मांडून न्यायाची मागणी केली. मंत्र्यांच्या भेटीनंतर पीडित कुटुंबाने समाधान व्यक्त केले.