सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विना हेल्मेट प्रवास जीवघेणा ठरतो, असे असताना देखील बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट टाळतात. परिणामी, अपघात झाल्यास मेंदूला जबर मार बसून गंभीर जखमी होतात. २०१९ या वर्षात विविध अपघातामध्ये जखमी झालेल्या ३६८४ चालकांना मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यातील ८०० चालकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, यात विना हेल्मेट चालकांची संख्या ६१२ होती.रस्ते अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मेडिकलने ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्या तीन वर्षांत जखमींची संख्या वाढली आहे. २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची चमू येथे कार्यरत असल्याने हे ‘सेंटर’ अनेकांसाठी वरदान ठरत आहे. परंतु अपघातांच्या वाढत्या संख्येने रुग्णांची संख्याही वाढली आहे. विशेष म्हणजे, हेल्मेटचा सक्तीचा वापर करण्याचा शासनाकडून प्रयत्न होत आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून विना हेल्मेट चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहे. मात्र, हेल्मेटचे महत्त्व माहीत असताना सुद्धा बहुसंख्य दुचाकीचालक त्याच्याकडे ओझे म्हणून पाहतात. यामुळे चौकात पोलीस असतील तरच हेल्मेट घालण्याचे किंवा पळवाटा शोधण्याची वृत्ती वाढत असल्याने रस्ता अपघातात विना हेल्मेट वाहनधारक गंभीर जखमी होत असून मृत्यूच्या दारात पोहचत आहे.गेल्या वर्षभरात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ६१२ चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणेही २१ चालकांसाठी मृत्यूचे कारण ठरले.
जखमींमध्ये ९० टक्के चालक विना हेल्मेटजानेवारी ते डिसेंबरपर्यंत ट्रॉमा केअर सेंटरमध्ये येणाऱ्या जखमींची माहिती गोळा करण्यात आली आहे. यात रस्ता अपघातात जखमी झालेल्या ९० टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. यातील ७६ टक्के जखमींना जीवाला मुकावे लागले. ही धक्कादायक वस्तूस्थिती आहे.डॉ. मोहम्मद फैजल, प्रमुख, आर्थाेपेडिक विभाग व ट्रॉमा केअर सेंटर
मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु हेल्मेट नसताना आणि ४५ किमी प्रतितासाच्या वेगाने चालणाºया मोटारसायकलीवरून चालक खाली पडल्यास त्याला चारपट गतीने मार लागतो. यात डोक्याचे हाड तुटण्याची व मेंदूला जबर मार बसण्याची शक्यता असते. ‘रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये विना हेल्मेट असलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या पाहता हेल्मेटचे गांभीर्य आवश्यक आहे.-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल२० ते ४० वयोगटात सर्वाधिक मृत्यूट्रॉमा केअर सेंटरने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. यात २० ते ४० या वगोटातील तरुण जास्त आहेत. अशा वयोगटातील तरुणांवरच त्यांच्या कुटुंबाची व वयोवृद्ध पालकांची जबाबदारी असते. त्यांच्या निधनाने त्यांचे अख्खे घर पोरके होऊन जात असते.