लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवीत केंद्रात सत्तेचा गड सर केला. रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा भगवा फडकवीत विजय संपादित केला. या विजयाबद्दल तुमाने यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : विजयाचे श्रेय कुणाला द्याल?उत्तर : मी मतांनी जिंकलो. मात्र रामटेक मतदार संघातील जनतेने माझे मन जिंकले. मतदार संघातील सामान्य नागरिक व शेतकरी माझ्या विजयाचे शिल्पकार आहेत.प्रश्न : आपल्या विजयात भाजपाचा वाटा किती?उत्तर : निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेना आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते अहोरात्र माझ्यासाठी झटले. भाजपच्या आमदारांनी त्यांच्या मतदार संघात मला लीड दिली. युती धर्माचा हा विजय आहे.प्रश्न : दुसरी टर्म मिळेल याची खात्री होती का?उत्तर : २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर पाचही वर्ष मतदारांच्या संपर्कात राहिलो. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीत धावून गेलो. त्यामुळे दुसरी टर्म मिळेल, याचा विश्वास होता.प्रश्न : शेतकऱ्यांसाठी काय करणार ?उत्तर : शेतकरी हा माझा कणा आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी मी आधीपासूनच आग्रही राहिलो आहे. संसदेतही शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोललो. सरकारने शेतकऱ्यांच्या हितांची धोरणे आखली आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती निश्चितच बदलेल.प्रश्न : मतदार संघाचा किती विकास झाला?उत्तर : विकास निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गत पाच वर्षांत रामटेक मतदार संघाचा लूक निश्चितच बदलला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्हा विकास निधीतून मतदार संघात भरपूर कामे झाली. खासदार फंडाचे योग्य नियोेजन केले. माझा विजय विकास कामांची पावती आहे.प्रश्न : पुढील पाच वर्षातील संकल्प?उत्तर : शेतकऱ्यांना बळ देणे, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील जनतेला चांगले उपचार मिळण्यासाठी मतदार संघातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणे.
हा तर लोकमताचा विजय : कृपाल तुमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 8:59 PM