सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात ३१ मार्चपर्यंत २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ‘असिम्टमॅटिक’ म्हणजे लक्षणे नसलेले १५३, लक्षणे असलेले २२ तर गंभीर असलेले तीन रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. विदर्भात सध्या उपचार घेत असलेल्या १५ रुग्णांना तूर्तास तरी कुठलेही लक्षण नसल्याची नोंद केली आहे. यामुळे रुग्णालयात १४ दिवस होऊन नमुने निगेटिव्ह येताच यांनाही सुटी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण नागपुरात ११ मार्च रोजी आढळून आला. १३ मार्च रोजी त्याची पत्नी आणि त्याचा सहकारी असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले तर १४ मार्च रोजी आणखी एक सहकारी पॉझिटिव्ह आढळून आला. पहिल्या बाधित रुग्णाचे रुग्णालयात १४ दिवस पूर्ण होऊन तीन नमुने निगेटिव्ह आल्याने २६ मार्च रोजी, दोन बाधित रुग्णाला २८ मार्च रोजी तर महिलाबाधित रुग्णाला २९ मार्च रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यवतमाळ मेडिकलमध्येही पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांनाही सुटी देण्यात आली आहे. विदर्भात आतापर्यंत एकूण २३ रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांना सुटी मिळाली आहे. सध्याच्या स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) नऊ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) तीन, बुलडाण्यात दोन तर गोंदिया मेडिकलमध्ये एक असे एकूण १५ रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने राज्यात उपचार घेत असलेल्या राज्यातील बाधित रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्या लक्षणांचा गोषवारा काढला आहे. त्यानुसार विदर्भात उपचार घेत असलेल्या सर्वच रुग्णांत कोरोनाची लक्षणे नसल्याची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, यातील काही बाधित रुग्णांनी आम्ही ठणठणीत असल्याचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकले आहे. यामुळे भरती झाल्यापासून १४ दिवस रुग्णालयात घालविल्यानंतर यांचे नमुने निगेटिव्ह येण्याची आणि रुग्णालयातून सुटी होण्याची दाट शक्यता आहे.- तूर्तास कोणतीही लक्षणे नाहीतमेयोमध्ये सध्याच्या स्थितीत नऊ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात जेव्हा हे रुग्ण उपचाराला आले तेव्हा काहींना ताप व कोरडा खोकला होता. परंतु आता कुणालाच कोणतीही लक्षणे नाहीत.डॉ. तिलोत्तमा पराते औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेयो