गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषिपंपांच्या जोडण्यांचा अनुशेष शिल्लक नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात असले तरी विदर्भातील अर्थात नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्ह्यात ७५ टक्के कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. विदर्भातील जवळपास सर्वच परिमंडळात ही स्थिती असल्याने आणि येत्या मार्चपर्यंत संपूर्ण जोडण्या देणे शक्य नसल्याने पुढच्या वर्षी अनुशेषात भर पडण्याचीच शक्यता अधिक आहे.नागपूर परिक्षेत्रामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडळांचा समावेश होतो. या पाचही परिमंडळांमिळून ३१ मार्च २०१९ पर्यंत ४१ हजार ७४३ कृषिपंपांना जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात १ नोव्हेंबरपर्यंत फक्त १० हजार ८३३ जोडण्या देण्यातच वीज कंपनीला यश आले आहे. हा विचार करता जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांनाच जोडण्या मिळाल्या असून अद्याप ७५ टक्के शेतकरी प्रतीक्षेत आहेत.२०१० पासून या प्रलंबित वीज कृषिपंपांच्या जोडण्या मागे पडण्यात भर पडत चालली आहे. २०१० ते २०१५ या काळात अनुशेषाची संख्या कमी होती. मात्र २०१५ नंतर ही संख्या झपाट्याने वाढल्याचे अर्थात मागणीही वाढल्याचे वीज कंपनीच्या अहवालात दिसत आहे.
सौर कृषिपंपातही मागेजानेवारी-२०१९ पासून राज्यात सौर कृषिपंप देण्याची योजना सरकारने लागू केली. त्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील अर्थात विदर्भातील ११ जिल्ह्यांना २५ हजार पंपांचे उद्दिष्ट दिले होते. त्यासाठी अनुदानही मंजूर केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ५० हजार १७ अर्ज ऑनलाईन आले होते. त्यापैकी ३३ हजार ५५ अर्ज पात्र ठरले. या ११ महिन्याच्या काळामध्ये फक्त २ हजार १६७ सौर कृषिपंपांच्या जोडण्या झाल्या आहेत तर ८२६ सौर पंपांचे काम प्रगतिपथावर असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात आहे.