लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल तीन महिन्यांचे वीजबिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने वीजबिलांची रक्कम भरमसाठ वाढली आहे. बिलाची रक्कम हप्त्याने भरण्याची सवलत देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी वाढीव वीज बिलाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. वाढीव बिलाच्या तक्रारीबाबत दररोज शेकडो लोक महावितरणच्या कार्यालयात धडक देत आहेत. नागरिकांच्या या असंतोषामुळे विविध संघटना व राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वाढीव वीज बिलाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.मध्य नागपुरातील बंगाली पंजा परिसरात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वाढीव वीज बिलाची होळी करीत निदर्शने केली. यावेळी आंदोलकांचे म्हणणे होते की, कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसमोर आज उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांकडे पैसा शिल्लक नाही. अशा वेळी सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना महावितरणने अव्वाचा-सव्वा बिल पाठवणे सुरू केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने वीज बिलातून नागरिकांची मुक्तता करावी, अशी मागणी केली. तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.भाजपही रस्त्यावर उतरणारभारतीय जनता पक्षानेही वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. १०० युनिटची स्लॅब ३०० युनिट करावी, आणि मध्य प्रदेश सरकारप्रमाणे १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केली आहे. सरकारने ऐकले नाही तर भाजपतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असे भाजपने पत्रपरिषद घेऊन स्पष्ट केले.
विदर्भवाद्यांनी केली वाढीव वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 8:17 PM