नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आरपारच्या लढाईला १९ डिसेंबरला सुरुवात होणार असून १० हजार विदर्भवादी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर धडक देणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १९ डिसेंबरला दुपारी एक वाजता यशवंत स्टेडियम येथून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. पंचशील चौक, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक या मार्गाने हा मोर्चा विधानभवनाकडे जाईल. आंदोलनाला जय विदर्भ पार्टी, खोरिप, विदर्भ माझा, नाग विदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी, भीम आर्मी संरक्षक दल, जे. पी. पार्टी, बीआरएसपी आदी पक्षांनी पाठिंबा दिल्याचे चटप यांनी सांगितले.
वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती त्वरित करावी, वीज दरवाढ मागे घ्यावी, शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडिंग बंद करावे, विदर्भातील ११ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला रंजना मामर्डे, अरुण केदार, नागपूर विभागाच्या अध्यक्ष रेखा निमजे, भंडारा महिला आघाडीच्या अध्यक्ष मनिषा पुंडे, माजी आमदार उपेंद्र शेंडे, प्रभाकर कोंडबत्तुनवार आदी उपस्थित होते.