लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा या अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या सारखेच विदर्भातील विविध स्थळांवरील पक्ष्यांचे आणि वन्यजीवांचे वैभव रेल्वेच्या डब्यांवर झळकविण्याची एमटीडीसीची भविष्यातील योजना आहे.विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मागील काही दिवसांपासून विविध उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंप्बई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवरच्या १७ बोगी यावर नागझिरामधील पक्षिवैभव सांगणारी आणि तेथील निसर्गरम्य छायाचित्रे लावण्यात आली आहेत. ही रेल्वे मुंबई-पुणे अशी धावते. महाराष्ट्रात येणारे बहुतेक पर्यटक मुंबई, पुण्याला येतात. या चित्रांच्या माध्यमातून विदर्भातील वनपर्यटनाची माहिती अन्य राज्यातील तसेच परदेशातील पर्यटकांना व्हावी, त्यातून पर्यटकांचा ओघ विदर्भात वाढावा, हा त्यामागील हेतू आहे. पर्यटनाच्या माध्यमातून विदर्भातील रोजगारांच्या संधी वाढविणे हा देखील यामागील हेतू आहे. राज्यात एमटीडीसीच्या माध्यामातून पर्यटनाला चालना देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात एमटीडीसीचे विविध ठिकाणी २३ पर्यटक निवासस्थाने आहेत. नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा हे त्यापैकी एक आहे.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच मुंबईतील डेक्कन क्वीनच्या या रेल्वे डब्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सूचना करून, विदर्भातील अन्य वनपर्यटन स्थळांवरील पक्षी आणि प्राण्यांची तसेच निसर्गस्थळांची छायाचित्रेही अन्य रेल्वे गाड्यांवर लावण्याची सूचना केली होती. पर्यटनाच्या विकासातूनच रोजगाराची संधी बेरोजगार युवकांना निर्माण होऊ शकते. विदर्भामध्ये असलेल्या अनेक स्थळांसोबतच हेरिटेज स्थळांचाही उपयोग यासाठी चांगल्या रीतीने करता येऊ शकतो. त्यामुळे पर्यटनच्या विकासाला अधिक चालना देण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या सूचनेनुसार आम्ही रेल्वे विभागासोबत संपर्क सुरू केला आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला रेल्वेच्या माध्यमातून वाव मिळाला तर नवा रोजगार वाढेल. डेक्कन क्वीनच्या रेल्वे डब्यांवर हा प्रयोग आम्ही केला आहे.अभिमन्यू कांबळे, व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी, मुंबई
नागझिरासह विदर्भातील पक्षिवैभव रेल्वे डब्यांवर झळकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 8:40 PM
विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा या अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
ठळक मुद्देएमटीडीसीकडून प्रयत्न : मुंबई-पुणे डेक्कन क्वीनवर नागझिरातील निसर्गचित्रे