विदर्भ राज्य आंदोलन समितीचा मोर्चा : हजारोंचा सहभाग, ठिय्या आंदोलनही नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येत हजारो विदर्भवाद्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर धडक दिली. पोलिसांनी मध्येच मोर्चा थांबविल्यामुळे विदर्भवाद्यांनी तेथेच ठिय्या दिला. सत्ता आल्यानंतरही भाजप नेते वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन पाळताना दिसत नाही, अशी नाराजी व्यक्त करीत १ जानेवारीपासून ‘विदर्भ देता की जाता’ आंदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा या वेळी करण्यात आली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दुपारी १.३० च्या सुमारास टिळक पुतळा महाल येथील भाजप कार्यालयापासून विदर्भवाद्यांचा मोर्चा निघाला. मोर्चात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, महिला आघाडीच्या अध्यक्ष अॅड. नंदा पराते, युवक आघाडीचे अध्यक्ष प्रदीप धामनकर (अमरावती), उमेशबाबु चौबे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धनंजय धार्मिक, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांच्यासह विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांतून आलेले हजारो विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले. महिला, युवकांसह आदिवासी बांधवांचाही सहभाग लक्षणीय होता. मोर्चेकरी आक्रमक होते. मोर्चातील लक्षवेधी गर्दीमुळे तब्बल तीन तास महालातील वाहतूक बंद ठेवण्यात आली. मोर्चा गडकरींच्या घराकडे आगेकूच करीत असताना घरापूर्वीच घाटे दुग्ध मंदिराच्या समोर पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत भाजप नेते व सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी युवा कार्यकर्त्यानी बॅरिकेट तोडून आगेकूच करण्याचा नारा दिला. मात्र, ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांना आवर घातला. शेवटी आंदोलकांनी तेथेच ठाण मांडले. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गडकरींचे स्वीय सहायक सुधीर देऊळगावकर निवेदन स्वीकारायला आले. त्यानंतर अॅड. वामनराव चटप यांनी मार्गदर्शन केले व मोर्चाचा समारोप झाला. आंदोलनात माजी आमदार दिलीप बनसोड, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ, विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अॅड. रवि सान्याल, माया चवरे, अॅड. गोविंद भेंडारकर, वनश्री शेडाम, राम आखरे, संदेश सिंगलकर, शरद पाटील, नितीन रोंघे, किशोर राऊत, डॉ. दीपक मुंढे, अरुण केदार, आनंदराव वंजारी, अर्चना नंदाघरे, मधुकर हरणे आदींनी भाग घेतला.
विदर्भवादी धडकले गडकरींच्या वाड्यावर
By admin | Published: August 10, 2016 2:14 AM