लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात उद्योग चांगले काम करीत आहेत, ही गौरवाची बाब आहे. कृषी परिवर्तनाचे क्षेत्र असून रोजगार निर्माण करणारे आहे. कृषी आणि उद्योगांनी विदर्भाचा शाश्वत विकास होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) ५६ व्या स्थापन दिनानिमित्त आयोजित विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार वितरण समारंभात मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. मंचावर व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, निवृत्त न्यायमूर्ती एम.एन. गिलानी आणि टाटा स्टील इंडस्ट्रीजचे (विपणन व विक्री) प्रमुख संजय एस. साहानी उपस्थित होते. यावेळी आठ वर्गवारीत उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.गडकरी म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्थेत समस्या येतात आणि जातात. पण त्यामुळे उद्योजकांना निराश होण्याची गरज नाही. पुढील काळ चांगलाच राहील, असा विश्वास आहे. अंकुर सीड्स कंपनीप्रमाणे विदर्भातील उद्योग वाढावेत. शेतकरी कसा सक्षम होईल, यावर भर देऊन कंपनीने उद्योगाचा विकास केला. व्हीआयएनेसुद्धा विदर्भातील उद्योजकांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी मदत करावी. कृषी क्षेत्रावर जास्त भर द्यावा. संशोधन, नाविन्यता आणि नवीन तंत्रज्ञानासाठी व्हीआयएने उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.आभार गौरव सारडा यांनी मानले. कार्यक्रमात खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, महापौर नंदा जिचकार, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव सीए मिलिंद कानडे, एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर, माजी खा. दत्ता मेघे, व्हीआयए लेडिज विंगच्या अध्यक्षा रिता लांजेवार, माजी अध्यक्ष अतुल पांडे, सुरेश अग्रवाल, प्रफुल्ल दोशी, उपाध्यक्ष आर.बी. गोयनका, डॉ. सुहास बुद्धे, आदित्य सराफ, कोषाध्यक्ष नरेश जखोटिया, गौरव सारडा, सहसचिव पंकज बक्षी, आशिष दोशी, अनिता राव आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.विविध वर्गवारीतील पुरस्कार विजेत्यांची नावे
- मोठे उद्योग
झिम लेबॉरेटरीज लिमिटेड, नागपूर.
- मध्यम उद्योग
डिफ्युजन इंजिनिअरिंग लिमिटेड, नागपूर.
- लघु उद्योग
महाराष्ट्र कार्बन प्रा.लिमिटेड, चंद्रपूर.
- महिला उद्योजिका
कनिका किशोर देवानी, प्रीमियर लाईफस्टाईल.
- क्षेत्रातील सर्वोत्तम स्टार्टअप उद्योग
श्री बालाजी रोड मार्किंग मशीन, नागपूर.
- क्षेत्रातील सर्वोत्तम निर्यातदार
स्टार सरक्लिप्स अॅण्ड इंजिनिअरिंग लिमिटेड.
- सर्वोत्तम सेवा पुरवठादार
काँक्रिट सोल्युशन्स, अमरावती.
- नागपूर विभागातील प्रॉमिसिंग युनिट
श्री साई सिमेंट ब्रिक्स अॅण्ड प्रॉडक्ट, गडचिरोली.
- अमरावती विभागातील प्रॉमिसिंग युनिट
एल अॅण्ड एम ड्रायफ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री, वाशीम.
- लाईफटाइम अॅच्युव्हमेंट अवॉर्ड
अंकुर सीड्स प्रा.लि.चे संचालक रवी काशीकर व माधव शेंबेकर.