लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या विकासाला नवीन दिशा देण्यासाठी राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार गठित विदर्भ विकास मंडळाची स्वत:चीच दिशा व दशा खराब झाली आहे. याचे उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. मंडळाच्या अध्यक्षांनी नियुक्ती झाल्यापासून तब्बल वर्षभरानंतर पदभार ग्रहण केला.राज्य सरकारने १२ जून २०१८ रोजी भाजपचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांना विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. परंतु त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. भाजपा सूत्रानुसार, संचेती यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असा अंदाज लावला जात होता. परंतु राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. त्यात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त आहे. या वर्षभरात असे अनेकांना वाटत होते की, राज्य सरकार दुसऱ्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवेल. परंतु त्यांनीही संचेती यांची प्रतीक्षा केली.संचेती यांनी सोमवारी सायंकाळी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाला ३ मार्च २०१५ नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष मिळाला आहे. माजी आमदार प्रकाश डहाके हे निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद प्रभारी म्हणून विभागीय आयुक्त सांभाळत आले आहेत. यापूर्वी १३ सप्टेंबर २०११ पासून २५ नोव्हेंबर २०१३ रोजी पद सांभाळेपर्यंत विभागीय अध्यक्षांकडेच अध्यक्षपदाचा प्रभार होता. २३ सप्टेंबर २००६ ते १२ सप्टेंबर २०११ पर्यंत आ. तुकाराम बिरकड हे विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष होते. प्रा. राम मेघे, अरुण अडसड व हर्षवर्धन देशमुख यांनीही अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणारविदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले की, ते मंडळाच्या माध्यमातून विदर्भ विकासाचा प्रयत्न करतील. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या माध्यमातून प्रलंबित समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतील. यावेळी मंडळाच्या कार्यकारी मंडळातील तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण आणि सहसंचालक प्रकाश डायरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे प्रशासनिक अधिकारी ईश्वर निवांत, चित्रा मेश्रे, वनिता सराफ, प्रवीण साळी आणि अनुराग नागराज उपस्थित होते. संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून वर्ष १९९५ , १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये विधानसभेत निवडून आले आहेत.