नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वेगवेगळ्या संघटना लढत आहेत. या सर्व संघटनांनी आता एकत्र यावे आणि एकत्रित लढा देण्यासाठी सज्ज व्हावे, असे माजी खासदार दत्ता मेघे आणि ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीहरी अणे या दोन विदर्भवादी नेत्यांच्या बैठकीत ठरले. अॅड. श्रीहरी अणे हे राज्याच्या महाधिवक्तापदाचा राजीनामा देऊन शनिवारी नागपुरात आले. त्यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तेव्हापासून ते स्वतंत्र विदर्भासाठी लढणाऱ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी त्यांनी राजकुमार तिरपुडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती तर रविवारी ज्येष्ठ विदर्भवादी नेते दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वनराईचे गिरीश गांधी, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, अॅड. संदेश सिंगलकर, महेश पुरोहित, राजू मिश्रा, मेहमूद अन्सारी, बाळ कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. दत्ता मेघे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अॅड. अणे आणि उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. विदर्भ राज्य सहजासहजी मिळणार नाही. लोकही सहजासहजी जुळणार नाहीत. त्यामुळे अगोदर तशी वातावरण निर्मिती करावी लागेल. त्यामुळे अगोदर विदर्भवादी संघटनांना एकत्र घ्यावे लागेल. स्वतंत्र विदर्भ व्हावा यासाठी अनेक संघटना काम करीत आहेत. त्या सर्वांनी एकत्र येऊन लढण्यावर एकमत झाले. त्या संघटनांनी आपापल्या संघटनांचा उद्देश संभाळून एकत्र यावे, असेही यावेळी ठरले. केवळ विदर्भवादी संघटनाच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीसुद्धा विदर्भासाठी काम करायला तयार आहेत, त्यांनाही सोबत घ्यावे, असे ठरले. (प्रतिनिधी)
विदर्भाचा लढा एकत्रित लढणार
By admin | Published: March 28, 2016 3:23 AM